Kanda Market News : कांद्याचे माहेरघर अर्थातच नासिक जिल्ह्यातून कांदा उत्पादकांसाठी दिलासादायक बातमी समोर येत आहे. खरं पाहता गेल्या आठवडाभरापासून कांदा दरात रोजाना थोडी थोडी वाढ होत आहे.
बाजारात येणारा नवीन लाल कांदा थोड्या चांगल्या दरात विकला जात आहे तर उन्हाळी कांदा दर अजूनही दबावातच आहे. दिंडोरी कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत येणाऱ्या वणी उप बाजारात देखील लाल कांदा कडाडला आहे. यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळू लागला आहे.
काल या उपबाजारात उन्हाळी व लाल अशा दोन्ही कांद्याची आवक झाली. एकूण चार हजार क्विंटल कांदा आवक झाली होती. उन्हाळी कांद्याला 1100 ते 1770 रुपये प्रतिक्विंटल असा दर मिळाला. तर लाल कांदा 1351 ते 2121 यादरम्यान विकला गेला. एकंदरीत आता उन्हाळी कांदा खूपच कमी प्रमाणात शिल्लक राहिला आहे.
मात्र लाल कांदा आता बाजारात येऊ लागला आहे आणि लाल कांदा दरातच वाढ होत असल्याने उत्पादकांना यामुळे नक्कीच दिलासा मिळत असल्याचे चित्र आहे. मात्र लाल कांद्याला देखील सध्या मिळत असलेला बाजारभाव शेतकऱ्यांच्या अपेक्षेप्रमाणे नसून शेतकऱ्यांना यामध्ये वाढ होण्याची आशा आहे.
खरं पाहता, यावर्षी कांदा शेतकऱ्यांना अतिशय कवडीमोल दरात विकावा लागला आहे. ऑक्टोबरचा संपूर्ण महिना आणि नोव्हेंबर महिन्यातील पहिला पंधरवडा सोडला तर कांद्याला अतिशय कमी दर मिळाला आहे. ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये मात्र कांद्याला साडेतीन हजार रुपये प्रति क्विंटल पर्यंतचा कमाल दर मिळू लागला होता तसेच सरासरी दर देखील 3000 रुपये प्रति क्विंटल एवढा नमूद केला जात होता.
मात्र नोव्हेंबरच्या दुसऱ्या पंधरवड्यापासून दरात जी घसरण झाली ती आतापर्यंत कायम होती. दरम्यान गेल्या चार ते पाच दिवसांपासून कांद्याच्या दरात वाढ झाली असून सरासरी बाजार भाव 1,500 रुपये प्रति क्विंटलच्या वर गेल्याने कांदा उत्पादकांच्या चेहऱ्यावर समाधान पाहायला मिळत आहे.