Kanda Market Maharashtra : दिवाळीच्या पूर्वसंध्येला राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. कांदा बाजार भावात पुन्हा एकदा वाढ होऊ लागली आहे. वास्तविक गेल्या काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रात कांद्याला चांगला समाधानकारक भाव मिळत होता.
घाऊक बाजारात कांदा कमाल सहा हजार रुपये प्रति क्विंटल पेक्षा अधिक दरात विकला जात होता. विशेष म्हणजे सरासरी बाजार भाव देखील चार हजार रुपये प्रति क्विंटल पर्यंत पोहोचले होते. काही ठिकाणी याहीपेक्षा अधिक भाव नमूद केला जात होता.
याचा परिणाम म्हणून किरकोळ बाजारात कांद्याच्या किमती शंभर रुपये प्रति किलोपर्यंत पोहोचल्या होत्या. यामुळे किरकोळ बाजारातील किमती नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्रातील मोदी सरकारने दोन अतिशय महत्त्वाचे निर्णय घेतलेत.
केंद्र शासनाने बफर स्टॉक मधील कांदा पंचवीस रुपये प्रति किलो या दरात किरकोळ बाजारात विकण्याचा निर्णय घेतला. केंद्र शासनाच्या माध्यमातून दोन लाख मेट्रिक टन माल किरकोळ बाजारात 25 रुपये प्रति किलो या भावात विकला जाणार आहे.
यासोबतच केंद्र शासनाने आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे.तो म्हणजे कांदा निर्यात करण्यासाठी किमान निर्यात मूल्य 400 डॉलर प्रति टन वरून वाढवून 800 डॉलर प्रति टन एवढे करण्यात आले आहे.
याचा परिणाम म्हणून देशांतर्गत कांद्याची उपलब्धता वाढली आहे आणि कांद्याची निर्यात मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे. एकंदरीत कांदा निर्यात बंदी न करता शासनाने हे निर्णय घेऊन कांद्याची अप्रत्यक्षरीत्या निर्यात बंदी केली आहे. याचा मात्र शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे.
या निर्णयामुळे किरकोळ बाजारात कांद्याच्या किमती फार कमी झाल्या नाहीत. पण घाऊक बाजारात याचे पडसाद पाहायला मिळत आहेत. कांदा बाजारभाव पुन्हा एकदा दबावात येऊ लागले आहेत. बाजारभावात सातत्याने घसरण होत आहे.
पण अशातच कालच्या लिलावात अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर एपीएमसी मध्ये उन्हाळी कांद्याला विक्रमी सहा हजाराचा भाव मिळाला आहे. त्यामुळे या परिसरातील शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण पाहायला मिळत आहे.
महाराष्ट्र राज्य कृषी उत्पन्न महामंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, काल अर्थातच आठ नोव्हेंबर 2023 रोजी पारनेर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 5828 क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक झाली होती. या मार्केटमध्ये कांद्याला किमान 1200, कमाल 6000 आणि सरासरी 3800 एवढा भाव मिळाला आहे.
या व्यतिरिक्त अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर एपीएमसी मध्ये काल कांद्याला किमान 500, कमाल 4550 आणि सरासरी 3500 एवढा भाव मिळाला आहे. तसेच काल संगमनेर एपीएमसी मध्ये उन्हाळी कांद्याला कमाल 4651 आणि सरासरी 2475 एवढा भाव मिळाला आहे.