Kanda Market : कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक अतिशय दिलासादायक अशी बातमी समोर येत आहे. ती म्हणजे गेल्या आठवड्यातील गुरुवारच्या तुलनेत काल गुरुवारी 30 नोव्हेंबर 2023 रोजी राज्यातील काही बाजारांमध्ये कांदा बाजार भावात सुधारणा झाली आहे.
यामुळे राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर पुन्हा एकदा समाधान पाहायला मिळत आहे. कांदा हे नासिक, पुण, सोलापूर, धुळे, अहमदनगर यासह राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये उत्पादित होणारे एक मुख्य नगदी पीक आहे.
या पिकाची राज्यातील जवळपास 24 जिल्ह्यांमध्ये कमी अधिक प्रमाणात लागवड केली जाते. म्हणजेच राज्यातील अनेक शेतकऱ्यांचे या पिकावर अर्थकारण अवलंबून आहे.
परिणामी जर कांद्याला चांगला भाव मिळाला तरच राज्यातील शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळते नाही तर शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी होत असते. या चालू वर्षाच्या सुरुवातीला देखील उत्पादक शेतकऱ्यांची चांगलीच कोंडी झाली होती.
फेब्रुवारी महिन्यापासून कांदा बाजार भावात मोठी मंदी आली होती. फेब्रुवारी ते जून या पाच महिन्यांच्या काळात कांद्याला अपेक्षित असा भाव मिळाला नाही. मात्र जुलै नंतर परिस्थिती थोडीशी बदलली.
हळूहळू बाजार भावात सुधारणा होऊ लागली. फेब्रुवारी ते जून या पाच महिन्यांच्या काळात कांद्याला फक्त चार ते पाच रुपये प्रति किलो एवढा भाव मिळत होता. मात्र गेल्या काही महिन्यांपासून कांद्याचे दर 35 ते 40 रुपये प्रति किलो दरम्यान पोहचले आहेत.
विशेष म्हणजे काही बाजारांमध्ये 40 ते 50 रुपये प्रति किलो असा भाव मिळत आहे. मध्यंतरी पन्नास रुपये प्रति किलो पेक्षा ही अधिकचा दर मिळत होता मात्र केंद्र शासनाने बफर स्टॉक मधील कांदा विक्रीस काढाला असल्याने बाजार भाव थोडे दबावात आले आहेत.
दरम्यान, पुणे जिल्ह्यातील जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत येणाऱ्या ओतूर उपबाजारात काल 30 नोव्हेंबर 2023 रोजी कांद्याला 5110 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल भाव मिळाला आहे.
या मार्केटमध्ये काल 13,634 कांदा गोण्यांची आवक झाली होती. यामध्ये काही ठराविक मालाला 4800 रुपये प्रति क्विंटल ते 5,110 रुपये प्रति क्विंटल एवढा भाव मिळाला आहे. गोळा कांदा 4400 ते 4800 रुपये प्रति क्विंटल दरम्यान विकला गेला आहे.
सुपर कांदा 3500 ते 4800 रुपये प्रति क्विंटल या दरात विकला गेला आहे. तसेच गोलटी कांद्याला 2000 ते 3500 असा भाव मिळाला आहे. याशिवाय तीन नंबर कांद्याला 1000 रुपये प्रति क्विंटल ते 3000 रुपये प्रति क्विंटल असा भाव मिळाला आहे.