Kanda Bajarbhav : बाजारात गेल्या दोन महिन्यांपासून टोमॅटोच्या दरात तेजी आली आहे. याचा परिणाम म्हणून राज्यातील टोमॅटो उत्पादकांना चांगला फायदा मिळत आहे. टोमॅटोचे दर बाजारात 150 ते 200 रुपये प्रति किलो पर्यंत पोहोचले आहेत. यामुळे शेतकऱ्यांना या पिकातून चांगले उत्पन्न मिळाले आहे. अनेक शेतकऱ्यांनी यातून करोडो रुपयांची कमाई देखील केली आहे.
खरतर, गेल्या काही महिन्यांपूर्वी टोमॅटोला बाजारात खूपच कमी दर मिळत होता. मार्च आणि एप्रिल महिन्यात तर पिकासाठी आलेला खर्च देखील शेतकऱ्यांना भरून काढता आला नाही. यामुळे काही शेतकऱ्यांनी टोमॅटो पिकात जनावरांना सोडले होते. पण आता गेल्या दोन महिन्यांपासून या लालभडक टोमॅटोने शेतकऱ्यांना कडक फायदा मिळवून दिला आहे.यामुळे टोमॅटो उत्पादकांच्या माध्यमातून समाधान व्यक्त केले जात आहे.
विशेष म्हणजे अजूनही बाजारात टोमॅटो तेजीतच आहे. अशातच आता टोमॅटो पाठोपाठ कांदा उत्पादकांना देखील दिलासा मिळणार असे चित्र तयार होणार आहे. कारण की, लवकरच कांद्याच्या बाजारभावात विक्रमी वाढ होणार असा अंदाज आहे. व्यापाऱ्यांनी सप्टेंबर महिन्यात दर्जेदार कांद्याच्या दरात इतिहासातील विक्रमी वाढ नमूद केली जाईल असे स्पष्ट केले आहे.
पुढील महिन्यात म्हणजे सप्टेंबर महिन्यात कांद्याच्या बाजारभावात दुपटीने वाढ होण्याची शक्यता आहे. खरंतर फेब्रुवारी ते जून या कालावधीत कांद्याला अपेक्षित असा भाव मिळाला नव्हता. यामुळे शेतकऱ्यांचे अर्थकारण बिघडले होते मात्र आता दरात वाढ होणार असा अंदाज असल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
काय म्हणताय व्यापारी?
पुढील महिन्यात कांद्याला किरकोळ बाजारात 55 ते 60 रुपये प्रति किलो असा भाव मिळणार असा अंदाज व्यापाऱ्यांच्या माध्यमातून व्यक्त करण्यात आला आहे. व्यापाऱ्यांनी सांगितल्याप्रमाणे सध्या मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांकडे कांदा शिल्लक आहे. परंतु दर्जेदार कांदा खूपच कमी प्रमाणात शिल्लक राहिला आहे.
यामुळे दर्जेदार कांद्याची मागणी येत्या काही दिवसात वाढणार असून पुरवठा कमी होईल आणि परिणामी दर्जेदार कांद्याच्या भावात विक्रमी वाढ होण्याची शक्यता आहे. सध्या कांद्याचे आगार म्हणून ख्याती प्राप्त असलेल्या नाशिक जिल्ह्यात घाऊक बाजारात कांद्याला पाच रुपये प्रति किलो ते 24 रुपये प्रति किलो असा भाव मिळत आहे.
तसेच किरकोळ बाजारात 25 ते 35 रुपये प्रति किलो हा भाव मिळत आहे. यात आता सुधारणा होणार असून किरकोळ बाजारात पुढल्या महिन्यात 55 ते 60 रुपये प्रति किलो असा दर मिळणार अशी शक्यता आहे.
दरवाढीचे कारण काय ?
हवामानात झालेल्या बदलामुळे आणि गेल्या काही दिवसांपूर्वी झालेल्या जास्तीच्या पावसामुळे कांदा पिकावर याचा परिणाम झाला आहे. साठवणुकीतल्या कांद्यावर देखील याचा विपरीत परिणाम पाहायला मिळाला आहे. अनेक भागात मोठ्या प्रमाणात कांदा खराब झाला आहे.
याव्यतिरिक्त सध्या मध्य प्रदेश, राजस्थान आणि महाराष्ट्र या प्रमुख कांदा उत्पादक राज्यात कांद्याचा पुरवठा हळूहळू कमी होऊ लागला आहे. विशेष म्हणजे या चालू महिन्याच्या अखेरपर्यंत कांद्याची आवक खूपच कमी होणार असून याचा परिणाम म्हणून दरवाढ होईल असा अंदाज आहे. दरवाढ झाली तर ज्या शेतकऱ्यांकडे कांदा असेल त्यांना फायदा होण्याची शक्यता आहे.