Kanda Bajarbhav : कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी समोर येत आहे. ती म्हणजे कांद्याचे बाजार भाव वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. महाराष्ट्र हे कांद्याच्या उत्पादनात अग्रेसर आहे. देशाच्या एकूण कांदा उत्पादनात आपल्या राज्याचा मोठा सिंहाचा वाटा आहे.
कांदा उत्पादनाच्या बाबतीत महाराष्ट्र हे देशातील एक नंबरचे राज्य आहे. साहजिकच राज्यातील शेतकऱ्यांचे अर्थकारण देखील या नगदी पिकावरच अवलंबून आहे. कांद्याला जर चांगला भाव मिळाला तर शेतकऱ्यांना बऱ्यापैकी उत्पन्न मिळते नाही तर मग पदरमोड करून कांद्याचा खर्च भागवावा लागतो.
यामुळे हे नगदी पीक अलीकडे शेतकऱ्यांना डोईजड सिद्ध होऊ लागले आहे. आता शेतकरी बांधव कांदा पिकाला पर्याय शोधत आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून कांदा बाजारातील असणारा लहरीपणा शेतकऱ्यांसाठी मारक ठरत आहे. या चालू वर्षाच्या सुरवातीला बाजारात खूपच लहरीपणा पाहायला मिळाला होता.
फेब्रुवारी ते जून या पाच महिन्यांच्या काळात बाजारात अगदी दोन ते तीन रुपये प्रति किलो या भावात कांदा विकावा लागला. यामुळे पिकासाठी आलेला खर्च देखील शेतकऱ्यांना पदरमोड करून भागवावा लागला. परिणामी संसारासाठी साठवलेला पैसा वाया गेल्याने शेतकऱ्यांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न ऐरणीवर येत होता.
परिस्थिती एवढी बिकट होती की शासनाला कांदा उत्पादकांना अनुदान जाहीर करावे लागले. दरम्यान जुलै महिन्यात कांद्याच्या बाजारभाव थोडीशी सुधारणा झाली. मात्र ही सुधारणा जास्त काळ टिकू शकली नाही. सरकारची कांदा बाजारात झालेल्या सुधारणेला नजर लागली.
सरकारने ऑगस्ट महिन्यात कांद्याचे किरकोळ बाजारातील बाजार भाव नियंत्रणात ठेवण्यासाठी कांदा निर्यात करण्यासाठी लागणाऱ्या शुल्कात 40 टक्के वाढ केली. याआधी कांदा निर्यातीसाठी शुल्क लागत नव्हते मात्र ऑगस्ट महिन्यात केंद्र शासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आणि कांद्यासाठी 40% निर्यात शुल्क जाहीर केले.
यामुळे कांद्याची देशातून होणारी निर्यात मंदावली. परिणामी देशांतर्गत साठा वाढला आणि हळूहळू कांद्याचे दर कमी होऊ लागलेत. पण गेल्या काही दिवसांपासून कांद्याच्या दरात थोडी-थोडी सुधारणा होऊ लागली आहे. सध्या स्थितीला कांद्याचे बाजार भाव समाधानकारक पातळीवर आहेत.
मात्र गेली पाच ते सहा महिने कवडीमोल दरात कांदा विकला असल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना आणखी भाव वाढला पाहिजे असे वाटत आहे. दरम्यान कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक गुड न्यूज आहे. ती म्हणजे खरीप हंगामातील कांदा लागवड पावसामुळे प्रभावित झाली असल्याने आगामी काही दिवसांत कांद्याच्या बाजारभावात सुधारणा होऊ शकते.
पावसाचे उशिराने झालेले आगमन आणि ऑगस्ट महिन्यात पावसाने दिलेला मोठा खंड यामुळे पावसाच्या रोपवाटिका पूर्णपणे बरबाद झाल्यात. परिणामी अनेक भागात कांद्याची लागवड होऊ शकलेली नाही. अशा स्थितीत खरीप हंगामातील कांद्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात कमी होण्याची शक्यता आहे.
यामुळे आगामी काळात कांद्याचे भाव वाढू शकतात असे तज्ञ लोकांच्या माध्यमातून सांगितले जात आहे. तर काही तज्ञांनी पुढील वर्षी इलेक्शन असल्याने किरकोळ बाजारात कांद्याच्या किमती नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्र सरकार काही कठोर निर्णय घेऊ शकते अशी आशंका व्यक्त केली आहे.
म्हणून आता कांद्याचे बाजार भाव वाढणार की नाही हे तर येणारा काळच सांगेल. पण जर बाजारभावात वाढ झाली तर कांदा उत्पादकांना दिलासा मिळेल यात शंकाच नाही.
राज्यातील बाजारात कांद्याला काय भाव मिळतोय?
आज राज्यातील कामठी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सर्वोच्च भाव मिळाला आहे. या मार्केटमध्ये कांद्याला कमाल तीन हजार रुपये, किमान दोन हजार रुपये आणि सरासरी 2500 रुपये एवढा भाव मिळाला आहे. याशिवाय कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज कांद्याला किमान एक हजार, कमाल 2800 आणि सरासरी 1900 रुपये एवढा भाव मिळाला आहे.