Kanda Bajarbhav : गेल्या चार ते पाच दिवसांपासून कांदा दरातील घसरगुंडी कायम आहे. मात्र कांदा बाजार भावात पुन्हा एकदा वाढ होणार असल्याचे चित्र उपस्थित होत आहे. खरं पाहता, गेल्या रब्बी आणि उन्हाळी हंगामातील कांदा चाळीत साठवलेला कांदा आता संपत चालला आहे.
तसेच, महाराष्ट्रातील ज्या भागात अर्ली खरीप कांदा लागवड केली जाते. म्हणजेच खरीप हंगामातील लवकर कांदा लागवड केली जाते अशा ठिकाणी कांद्याला अतिवृष्टीचा मोठा फटका बसला आहे.
तसेच राज्यातील इतरही प्रमुख खरीप लाल कांदा उत्पादक भागात परतीच्या पावसाचा फटका बसला आहे. साहजिकच यामुळे उत्पादनात घट होणार आहे. आता एकीकडे कांदा चाळीत साठवलेला कांदा संपत चालला असून लाल कांदा देखील बाजारात अपेक्षित असा उपलब्ध होणार नसल्याने कांदा दरात वाढ होणार आहे. मात्र असे असले तरी सध्या कांद्याची परिस्थिती अतिशय बिकट बनली आहे.
पदरात अवघ्या पाच दिवसात मोठी घसरण झाली आहे. राज्यातील बहुतांशी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 1000 रुपयांपर्यंत सरासरी बाजार भावात घसरण पाहायला मिळत आहे. पाच दिवसांपूर्वी राज्यातील जवळपास सर्वच कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याला 2500 रुपये प्रति क्विंटलचा सरासरी दर मिळू लागला होता. मात्र आता यामध्ये हजार रुपयांची घसरण झाली असून सध्या कांद्याला 1500 रुपये प्रतिक्विंटल च्या आसपास सरासरी दर मिळत आहे.
काही ठिकाणी यापेक्षाही कमी दर मिळत आहे. काल राहुरी एपीएमसी मध्ये कांद्याला मात्र 1000 रुपये प्रति क्विंटलचा सरासरी बाजार भाव मिळाला आहे. यामुळे निश्चितच कांदा उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे. दरम्यान, भविष्यात कांद्याची उपलब्धता आणि मागणी याचा जर विचार केला तर कांदा दरात वाढ होण्याची शक्यता आहे. मात्र बाजारपेठेतील चित्र बघितले तर कांदा दरात वाढ होईल की नाही याबाबत तज्ञ देखील साशंक आहेत. खरं पाहता कांदा दराबाबत कोणालाच भविष्यवाणी करता जमत नाही.
कांदा नेहमीच बेभरवशाचे पीक म्हणून ओळखले गेले आहे. याचा प्रत्यय सध्या बाजारपेठेतील चित्र पाहून येतच आहे. दरम्यान काही मीडिया रिपोर्ट मध्ये कांदा दरात वाढ होणार असल्याचे सांगितले जात आहे. एका मीडिया रिपोर्टनुसार, काढणीसाठी आलेला नवीन लाल कांदा अतिवृष्टीमुळे खराब झाला असून उत्पादनात घट होणार आहे. तसेच बराकित साठवलेला कांदा संपत चालला आहे. यामुळे कांदा दरात वाढ होण्याची शक्यता आहे.
शेतकऱ्यांच्या मते भविष्यात कांदा दर वाढले तरीदेखील त्यांना याचा फायदा होणार नाही. कारण की त्यांच्याकडे कांदा खूपच कमी प्रमाणात शिल्लक आहे. काही शेतकऱ्यांकडे कांदाच नाही. उन्हाळी कांदा विकला गेला असून नवीन लाल कांदा त्यांच्या पदरात आलेला नाही.
एकंदरीत परिस्थिती पाहता भविष्यात कांदा दरात वाढ जरी झाले तरी शेतकऱ्यांना याचा काहीही फायदा होणार नाही. ज्या शेतकरी बांधवांकडे नवीन लाल कांदा मुबलक प्रमाणात उत्पादित होणार असेल त्यांना मात्र या दरवाढीचा फायदा होऊ शकतो. तूर्तास बाजारपेठेतील चित्र पाहिले तर कांदा दरवाढ होईल की नाही याबाबत जाणकार देखील साशँक आहेत.