Kanda Bajarbhav : कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी थोडीशी दिलासादायक बातमी समोर येत आहे. येत्या काही दिवसात कांदा बाजार भावात वाढ होण्याची शक्यता तज्ञ लोकांकडून वर्तवली जात आहे. खरं पाहता, गतवर्षीच्या रब्बी आणि उन्हाळी हंगामात उत्पादित केलेला कांदा शेतकरी बांधवांनी दरवाढीच्या अनुषंगाने कांदा चाळीत साठवून ठेवला होता. मात्र शेतकऱ्यांची दरवाढीची आशा फोल ठरली.
जाणकार लोकांच्या मते सप्टेंबर महिन्यापर्यंत मोठ्या प्रमाणात शेतकरी बांधवांनी कांद्याची साठवणूक करून ठेवली. ऑगस्ट ते नोव्हेंबर या कालावधीत बाजारात कांद्याची आवक कमी होते आणि बाजार भाव वाढतात हा वर्षानुवर्षेचा अनुभव शेतकऱ्यांना माहिती आहे. यामुळे त्यांनी रब्बी आणि उन्हाळी हंगामातील कांदा त्यावेळी कमी बाजार भाव मिळत असल्याने साठवून ठेवला होता.
मात्र, ऑक्टोबर महिना उजाडला तरी देखील यावर्षी कांदा दरात पाहिजे तशी वाढ झाली नाही. आता नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीपासून कांदा बाजार भावात थोडी-थोडी वाढ पाहायला मिळत आहे. मात्र आता कांदा चाळीत साठवलेल्या कांद्याचे नुकसान अधिक झाले आहे आणि आता वाढीव जरी दर मिळत असला तरी शेतकऱ्यांना याचा किती फायदा मिळत आहे हेही सांगणे थोडे मुश्किल बनले आहे.
यावर्षी सप्टेंबर पर्यंत 900 रुपये प्रति क्विंटल ते १३०० रुपये प्रतिक्विंटल पर्यंतचा बाजार भाव कांद्याला मिळाला. तसेच आता नोव्हेंबर मध्ये कांद्याला 1800 रुपये प्रति क्विंटल ते 2400 रुपये प्रति क्विंटल पर्यंतचा बाजार भाव मिळत आहे. म्हणजेच सध्या मिळत असलेला बाजार भाव देखील खूपच काही विक्रमी आहे अस नाही. शिवाय शेतकरी बांधवांनी कांदा चाळीत साठवलेला कांदा हा निम्म्याहून अधिक खराब झाला आहे. अशा परिस्थितीत तरी बांधवांना कांदा दरात थोडी वाढ झाली असली तरी देखील त्याचा फायदा होत नसल्याचे चित्र आहे.
दरम्यान, मध्यप्रदेश आणि कर्नाटक या दोन प्रमुख कांदा उत्पादक राज्यातून सध्या खरीप हंगामामधील लाल कांद्याची आवक होत आहे. मात्र या दोन्ही राज्यातून होणारी लाल कांदा व खूपच कमी आहे. शिवाय आपल्या राज्यातील लाल कांदा लागवड पावसाच्या लहरीपणामुळे प्रभावित झाली आहे. लेट खरीप तसेच रब्बी हंगामासाठी लावलेली कांदा रोपवाटिका पावसामुळे क्षतीग्रस्त झाले आहे.
त्यामुळे यावर्षी या दोन्ही कांद्याच्या लागवडीखालील क्षेत्रात घट होणार आहे. अशा परिस्थितीत लेट खरीप आणि रब्बी हंगामात उत्पादित होणारे कांद्याचे उत्पादन घटणार आहे. म्हणजेच एकीकडे साठवलेला उन्हाळी कांदा तसेच रब्बी हंगामातील कांदा संपत चालला आहे तर दुसरीकडे खरीप हंगामातील कांदा देखील बाजारात मोठ्या प्रमाणात आवक होत नसल्याचे चित्र आहे.
तसेच आगामी काही महिने अशीच परिस्थिती राहणार आहे. यामुळे सध्या किंचित असे वाढलेले दर भविष्यात अजून वधारू शकतात असा अंदाज जाणकारांकडून वर्तवला जात आहे. मात्र कांद्याच्या बाजारभावात वाढ झाल्यानंतर केंद्र शासनाने पुन्हा एकदा कांदा किमती नियंत्रित ठेवण्यासाठी उपाययोजना सुरू केल्या तर निश्चितच पुन्हा एकदा कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान अटळ आहे.