Kanda Bajarbhav : कांदा हे महाराष्ट्रातील एक मुख्य पीक आहे. आपल्या राज्यातील बहुतांशी शेतकऱ्यांचे कांदा पिकावर अर्थकारण अवलंबून असते. मात्र यावर्षी पावसाच्या लहरीपणाचा खरीप हंगामातील लाल कांद्याला मोठा फटका बसला आहे. पावसाच्या लहरीपणामुळे यावर्षी खरीप हंगामातील लाल कांदा लागवड तब्बल दोन महिने उशिरा झाली आहे.
मित्रांनो खरं पाहता जून महिन्यात खरीप कांदा लागवड सुरू होते मात्र जून मध्ये राज्यात पाऊस पडला नसल्याने कांदा लागवड करता आली नाही. तसेच जुलै आणि ऑगस्ट महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे कांदा पिकाच्या रोपवाटिका खराब झाल्या. परिणामी कांदा लागवड खोळंबली एवढेच नाही तर अतिवृष्टीमुळे आणि परतीच्या पावसामुळे कांदा पिकाला मोठा फटका बसला असून उत्पादनात तब्बल 40% घट होण्याचा अंदाज वर्तवला गेला आहे.
शिवाय आता शेतकऱ्यांनी कांदा चाळीत साठवलेला उन्हाळी कांदा देखील संपत आला आहे. अशा परिस्थितीत बाजारात कांद्याचा शॉर्टेज निर्माण झाला असून कांदा दरात वाढ झाली आहे. दरम्यान जाणकार लोकांनी दिलेल्या माहितीनुसार खरीप हंगामातील लाल कांद्याची उत्पादकता कमी होणार आहे. त्यामुळे नवीन लाल कांदा बाजारात आल्यानंतर देखील कांदा बाजारात तेजी राहण्याची शक्यता आहे.
दरम्यान चांगल्या क्वालिटीच्या कांद्याच्या दरात दिवाळीनंतर तब्बल 1000 रुपयांची वाढ झाल्याचे मीडिया रिपोर्ट मध्ये सांगितले गेले आहे. आशिया खंडातील सर्वात मोठी बाजारपेठ अर्थातच लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये ऑक्टोबर महिन्यात सरासरी एक हजार 500 रुपयांचा बाजारभाव कांद्याला मिळत होता मात्र तोच दर नोव्हेंबर महिन्यात तब्बल 2500 रुपये प्रति क्विंटल सरासरीवर येऊन ठेपला आहे.
दरम्यान शेतकरी बांधवांच्या मते कांदा दरात वाढ झाली असली तरी देखील कांदा उत्पादनात घट झाली आहे. शिवाय जुना उन्हाळी कांदा कांदाचाळीत साठवून ठेवताना शेतकऱ्यांना अधिकचा खर्च करावा लागला आहे. तसेच कांदा चाळीत साठवलेला कांदा देखील सडला आहे. अशा परिस्थितीत तिथे देखील शेतकऱ्यांना नुकसान झाले आहे. यामुळे सध्या कांदा दरात वाढ झाली असली तरी देखील शेतकऱ्यांना याचा फारसा फायदा होत नसल्याचे चित्र आहे.