Kanda Bajarbhav Maharashtra : कांदा हे महाराष्ट्रात उत्पादित होणारे एक प्रमुख पीक आहे. या पिकाची राज्यात खरीप, लेट खरीप आणि उन्हाळी हंगामात मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. मात्र सर्वात जास्त उत्पादन उन्हाळी हंगामात अर्थातच रब्बी हंगामात घेतले जाते. विशेष म्हणजे रब्बी हंगामातील कांदा अधिक काळ साठवता देखील येतो.
यामुळे रब्बी कांदा उत्पादित करण्यास शेतकरी अधिक पसंती दाखवतात. देशाच्या एकूण कांदा उत्पादनाचा विचार केला असता देशातील एकूण कांदा उत्पादनात महाराष्ट्र राज्याचा मोठा सिंहाचा वाटा आहे. तसेच राज्यातील एकूण कांदा उत्पादनात नासिक, पुणे, सोलापूर, अहमदनगर सारख्या जिल्ह्याचा मोठा वाटा आहे. खरंतर हे एक नगदी पीक आहे.
अलीकडे मात्र या नगदी पिकाची लागवड शेतकऱ्यांसाठी डोईजड सिद्ध होत आहे. कित्येकदा तर शेतकऱ्यांना कांदा या पिकासाठी आलेला उत्पादन खर्च देखील भरून काढता येत नाही. याचे मुख्य कारण म्हणजे कांदा बाजारातील लहरीपणा. अनेकदा बाजारात कांदा रद्दी पेक्षा कमी भावात विकला जातो. या चालू वर्षात याची प्रचिती आपल्याला आलीच असेल.
या चालू वर्षात फेब्रुवारी आणि मार्च या कालावधीमध्ये कांदा मात्र दोन ते तीन रुपये प्रति किलो या बाजारभावात विकला गेला होता. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले होते. परिस्थिती एवढी बिकट होती की शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासनाने 350 रुपये प्रति क्विंटल प्रति शेतकरी 200 क्विंटल च्या मर्यादित अनुदान देखील जाहीर केले.
फेब्रुवारी ते जून या पाच महिन्यांच्या काळात कांद्याला अपेक्षित असा भाव मिळालाच नाही. पण जुलै महिन्यात परिस्थिती बदलली आणि कांद्याला समाधानकारक दर मिळू लागला. ऑगस्ट महिन्यात तर कांद्याला विक्रमी भाव मिळत होता. मात्र कांदा बाजारात आलेली ही तेजी शासनाच्या डोळ्यात खुपली.
शासनाने किरकोळ बाजारात कांद्याच्या किमती नियंत्रणात करण्याचे कारण पुढे करून कांदा निर्यातीसाठी 40% शुल्क आकारण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे काही दिवस कांद्याचा बाजार पुन्हा एकदा मंदीकडे सरकू लागला. मात्र आता गेल्या पाच-सहा दिवसांपासून पुन्हा एकदा कांदा बाजार तेजीच्या दिशेने रवाना झाला आहे.
दरम्यान आज अर्थातच 9 सप्टेंबर 2023 रोजी राज्यातील एका महत्त्वाच्या बाजारात कांद्याला तब्बल सहा हजार रुपये प्रति क्विंटल एवढा विक्रमी भाव मिळाला आहे. आज सोलापूर एपीएमसी मध्ये कांद्याला सहा हजार रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल भाव मिळाला आहे.
कोणत्या कांद्याला मिळाला विक्रमी भाव
महाराष्ट्र राज्य कृषी उत्पन्न महामंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरून प्राप्त झालेल्या माहितीनुसार, आज सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये पांढऱ्या कांद्याला सहा हजार रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल भाव मिळाला आहे. या मार्केटमध्ये आज 266 क्विंटल पांढरा कांद्याची आवक झाली होती.
यात पांढऱ्या कांद्याला किमान 200, कमाल सहा हजार रुपये आणि सरासरी 2,700 प्रतिक्विंटल एवढा भाव मिळाला आहे. यासोबतच, सोलापूर एपीएमसीमध्ये 14,525 क्विंटल लाल कांद्याची देखील आवक झाली होती. या मार्केटमध्ये आज लाल कांद्याला किमान 200, कमाल 3100 आणि सरासरी 1,600 एवढा भाव मिळाला आहे.