Kanda Bajarbhav : महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक अतिशय कामाची बातमी समोर येत आहे. खरं पाहता बाजारात आता नवीन लाल कांदा दाखल झाला आहे. दिवाळीपूर्वी नवीन लाल कांद्याची आवक बोटावर मोजण्या इतकीच होती. मात्र आता नवीन लाल कांदा बाजारात मोठ्या प्रमाणात आवक होत आहे. शिवाय आता लाल कांदा चांगला भाव खात असल्याचे चित्र आहे. नाशिक जिल्ह्यात लाल कांद्याला या हंगामातील विक्रमी दर मिळाला आहे.
नाशिक जिल्ह्यातील उमराणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये लाल कांद्याला तब्बल 5800 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजारभाव मिळाला असल्याने परिसरातील कांदा उत्पादक शेतकरी बांधवांच्या भुवया पुन्हा एकदा उंचवल्या आहेत. यामुळे भविष्यात लाल कांदा अजूनच कडाडणार असे शेतकऱ्यांना वाटू लागले आहे.
दरम्यान उन्हाळी कांदा दरात घसरण होत असल्याने शेतकरी बांधवांनी गेली पाच ते सहा महिने तळ हाताच्या फोडाप्रमाणे साठवलेला उन्हाळी कांदा कवडिमोल दरात विकण्याची नामुष्की ओढावली आहे. निश्चितच कांद्याच्या आकारात कांदा उत्पादक शेतकरी बांधवांच्या चेहऱ्यावर संमिश्र भाव पाहायला मिळत आहेत. कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये कही खुशी तो कही गम अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
कांदा उत्पादक शेतकरी बांधवांनी कांदा दरात वाढ होईल या अनुषंगाने उन्हाळी कांदा कांदा चाळीत साठवून ठेवला. शिवाय यावर्षी पावसाच्या लहरीपणामुळे नवीन लाल कांदा मोठ्या प्रमाणात बाजारात दाखल होण्यास उशीर होणार आहे. यामुळे उन्हाळी कांदा दरात वाढ होणारच असे शेतकऱ्यांना वाटत होते. यामुळे शेतकऱ्यांनी कांदा लावून धरला. झालं देखील तसंच नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीला उन्हाळी कांद्याच्या दरात मोठी तेजी आली.
मात्र तदनंतर कांदा दरात घसरण झाली. आणि आता बाजारात नवीन लाल कांदा आला असल्याने उन्हाळी कांद्याची मागणी कमी झाली असून उन्हाळी कांद्याची आवक वाढली आहे. परिणामी उन्हाळी कांद्याच्या दरात घसरण झाली असून लाल कांद्याच्या दारात वाढ झाली आहे. उमराणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये लाल कांद्याला पाच हजार आठशे रुपये प्रतिक्विंटलचा कमाल बाजारभाव मिळाला असल्याने शेतकरी बांधवांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.
तसेच ज्या शेतकरी बांधवांकडे उन्हाळी कांदा शेष आहे अशा शेतकरी बांधवांचा पुन्हा एकदा भ्रमनिरास झाला आहे. उन्हाळी कांद्याला उमराणे एपीएमसी मध्ये दोन हजार रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला असून 1300 रुपये प्रति क्विंटल एवढा सरासरी बाजारभाव मिळाला आहे.