Kanda Bajarbhav : यावर्षी एप्रिल महिन्यात उत्पादित झालेला उन्हाळी कांदा जवळपास पाच महिने अतिशय कवडीमोल दरात शेतकऱ्यांना विकावा लागला. सप्टेंबरनंतर मात्र चित्र बदलले कांद्याच्या दरात वाढ झाली.
ऑक्टोबर मध्ये मागणी वाढल्याने कांद्याला समाधानकारक बाजार भाव मिळाला. नोव्हेंबरमध्ये मात्र कांद्याला विक्रमी दर मिळू लागला. या चालू महिन्याच्या सुरुवातीला कांद्याला तब्बल 2500 रुपये प्रतिक्विंटल सरासरी बाजारभाव मिळत होता तर कमाल बाजारभावाने 3500 चा टप्पा ओलांडला.
मात्र गेल्या आठ दिवसात कांद्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे. आता कांद्याला मात्र 1300 रुपये प्रति क्विंटलचा सरासरी दर मिळत आहे. यामुळे शेतकरी बांधव मोठ्या चिंतेत सापडला आहे.
खरं पाहता गेल्या रब्बी हंगामातील उन्हाळी कांदा शेतकऱ्यांनी अतिशय तळहाताच्या फोडाप्रमाणे जोपासला. गत रब्बी हंगामातील कांदा हवामानातील बदलामुळे वावरातच जवळपास 50% खराब झाला होता. शेतकऱ्यांना मात्र 50% पर्यंतचे उत्पादन हाती आले. मात्र सुरुवातीला एप्रिल महिन्याच्या आसपास कांद्याला अतिशय नगण्य दर मिळत होता.
मग शेतकऱ्यांनी यामध्ये त्यांनी चांगल्या प्रतवारीचा कांदा दरवाढीच्या अपेक्षेने कांदा चाळीत साठवण्याचा निर्णय घेतला. साठवणुकीतील कांदा देखील शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात खराब झाला.
ऑक्टोबर आणि नोव्हेंबरच्या पहिल्या पंधरवड्यात कांद्याला समाधानकारक दर मिळाला. यामुळे झालेलं नुकसान वाढीव दराने भरून निघेल अशी शेतकऱ्यांची आशा होती. मात्र शेतकऱ्यांची ही अपेक्षा आता फोल ठरली असून कांदा दरात पुन्हा एकदा घसरण झाली आहे.
कांदा दरात घसरण होण्याची काही प्रमुख कारणे खालीलप्रमाणे :-
जाणकार लोकांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यांत उन्हाळ कांद्याबरोबरच आता खरीप लाल कांद्याची आवक मोठ्या प्रमाणात सुरू झाली आहे. तसेच मध्य प्रदेशात उन्हाळ कांद्याचा अद्याप साठा काही प्रमाणात शिल्लक आहे.
महाराष्ट्रासह, मध्य प्रदेश, गुजरात, तेलंगणा, कर्नाटक व गुजरात राज्यांत खरीप हंगामातील नव्या मालाची आवक विक्रमी होत आहे.
दक्षिणेकडील कांदा मुख्यत्वे नोव्हेंबर महिन्यात संपतो मात्र दक्षिणेमध्ये अजूनही मोठ्या प्रमाणात कांदा आवक होत आहे. अशा परिस्थितीत व्यापारी लोक दक्षिण मध्ये कांदा खरेदी करत असून महाराष्ट्रात कांदा खरेदीसाठी येत नसल्याचे चित्र आहे, देशांतर्गत कांदा मुबलक प्रमाणात आवक होत आहे.
बांगलादेश, श्रीलंका या प्रमुख आयातदार देशांत पुरवठा कमी आणि निर्यातीचा माल देखील स्वस्तात विकला जात आहे. या कारणांमुळे कांदा दरात घसरण होत आहे.