Kanda Bajarbhav : कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना दरवर्षी कांदा दराच्या लहरीपणाचा फटका बसतो. गेल्या रब्बी आणि उन्हाळी हंगामात उत्पादित केलेला कांदा शेतकरी बांधवांनी कांदा चाळीत दरवाढीच्या आशेने साठवला आहे.
मात्र नवीन कांदा बाजारात दाखल झाला तरी देखील कांद्याला अपेक्षित असा दर मिळत नसल्याचे चित्र आहे. खरं पाहता नोव्हेंबर महिन्यात कांदा दरात सुधारणा झाली मात्र खात दोन्ही एपीएमसी मध्ये कमाल बाजारभावात वाढ पाहायला मिळते मात्र सरासरी बाजार भाव अजूनही दबावातच आहेत. अशा परिस्थितीत वाढलेले दर हे फसवे आहेत.
सरासरी दर अजूनही कमीच आहेत. शिवाय थोड्याफार प्रमाणात सरासरी बाजार भावात जरी वाढ झाली असली तरी देखील उत्पादनासाठी केलेला खर्च कांदा चाळीत साठवण्यासाठी केलेला खर्च, शिवाय कांदा चाळीत कांदा साठवल्यामुळे झालेली घट याचा एकंदरीत विचार करता रब्बी आणि उन्हाळी हंगामातील कांदा पिक शेतकऱ्यांसाठी तोट्याचे सिद्ध झाले आहे. तसेच खरीप हंगामातील लाल कांदा देखील शेतकऱ्यांना फार काही मिळवून देत आहे असं काही नाही.
खरं पाहता खरीप हंगामातील लवकर लागवड झालेला कांदा सोलापूर साक्री यांसारख्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये पाहायला मिळत आहे. मात्र नवीन लाल कांदा बाजारात दाखल झाला असला तरी देखील जुन्या कांद्याचे आवक मुबलक प्रमाणात होत असल्याने लाल कांद्याला अपेक्षित असा दर मिळत नसल्याचे समजत आहे. किरकोळ बाजारात कांद्याला 20 ते 30 रुपये किलो एवढा दर मिळत आहे. घाऊक बाजारात हा दर निम्म्याहून कमी असतो साहजिकच कांद्याला हजार ते पंधराशे रुपये प्रतिक्विंटल एवढा सरासरी बाजार भाव मिळत आहे. म्हणजेच शेतकरी बांधवांचा कांद्याने पुन्हा एकदा वांदा केला आहे.
शेतकरी बांधवांच्या मते कांदा पिकासाठी एकरी 50 हजार रुपयांपर्यंतचा खर्च होत आहे. यामध्ये एकरी २ किलो, बियाणे ३,२०० रुपये लागतात, रोपवाटिका मजुरी – २,५०० रुपये लागते, वाफा तयार करणे बैलजोडी – २००० रुपये लागतात, लागवड मजुरी एकरी : १०,००० रुपये, लागतात, दोन वेळा खुरपणी – ५,००० रुपये, लागतात भेसळ डोस खत : १०,००० रुपये आवश्यक आहेत, कीटकनाशक फवारणी : ५,००० रुपये, कांदा काढणी मजुरी – १०,००० रुपये, कांदा प्रती पिशवी – ३० रुपये, वाहतूक – ३,००० रुपये, अंदाजे खर्च एकरी – ५०,००० रुपये लागतो. तसेच हवामानाचा लहरीपणा नसला तर एकरी 50 क्विंटल पर्यंत उत्पादन होते. आणि जर 1 हजार रुपये प्रति क्विंटल ते पंधराशे रुपये प्रति क्विंटल असा कांदा बाजार भाव पकडला तर शेतकऱ्यांना अवघे 50 हजार रुपये ते 75000 पर्यंतचे उत्पन्न मिळते.
यामध्ये खर्च वजा केला असता झिरो रुपये ते 25 हजार रुपयांपर्यंतची कमाई शेतकऱ्यांना एकरी होत असते. म्हणजेच कांदा पीक हे नगदी पीक नसून केवळ कागदी पीक आहे, कारण की कांदा पिकांपासून शेतकऱ्यांना प्रत्यक्षात नगद कमी मिळते मात्र कागदावरती नगद अधिक मिळते.
खानदेशात कांदा पिकाबाबत एक म्हण विशेष प्रचलित आहे. खांदेशात कांदा पिकावर कोंबडीचा देखील व्यवहार करू नये असे म्हणतात. कदाचित कांदा दरातील लहरीपणा, निसर्गाचा कांदा पिकाला बसत असलेला फटका, यामुळे कांदा पिकातून मिळणाऱ्या उत्पन्नाबाबत अचूक आकडा न बांधता येणे या कारणामुळे खानदेशात ही म्हण विशेष प्रचलित झाली असावी.