Kanda Bajarbhav : पावसाचा लहरीपणा यंदा शेतकऱ्यांसाठी खूपच मारक ठरत आहे. यावर्षी मानसून काळात महाराष्ट्रात जवळपास 12% कमी पाऊस पडला असल्याचे हवामान खात्याने स्पष्ट केले आहे. यामुळे राज्यातील विविध भागांमध्ये दुष्काळ सदृश्य परिस्थिती तयार झाली आहे. दुष्काळामुळे खरीप हंगामातील पीक उत्पादनात मोठी घट आली आहे. शिवाय यामुळे लाल कांदा लागवड आणि रांगडा कांदा लागवड उशिराने झाली आहे.
अशातच आता गेल्या दोन दिवसांपासून राज्यातील विविध भागांमध्ये अवकाळी पाऊस सुरू आहे. काल राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस आणि गारपीट झाली आहे. नाशिक जिल्ह्यातील निफाड, चांदवड तालुक्यातही गारपीट झाली. याशिवाय येवला, देवळा, सटाणा, मालेगावसह विविध भागांमध्ये जोरदार अवकाळी पाऊस झाला आहे.
त्याचा परिणाम म्हणून नाशिक जिल्ह्यासह राज्यातील विविध भागांमधील शेती पिकांना मोठा फटका बसला आहे. अवकाळी पावसामुळे द्राक्ष आणि कांदा पिकाचे सर्वाधिक नुकसान झाल्याचे मत शेतकऱ्यांनी नमूद केले आहे. रांगडा आणि लाल कांद्याचे या पावसाने मोठे नुकसान केले असून याचा परिणाम म्हणून आता लाल कांद्याचे आणि रांगडा कांद्याचे उत्पादन घटणार असा दावा केला जात आहे.
याचा परिणाम म्हणून बाजारात अचानक कांद्याच्या दरात तेजी आली आहे. आशिया खंडातील सर्वात मोठी कांदा बाजारपेठ म्हणून नावारूपाला आलेल्या लासलगाव एपीएमसीमध्ये अवकाळी पावसामुळे आणि गारपिटीमुळे कांदा पिकाचे मोठे नुकसान झाले असल्याने आज अर्थातच सोमवारी झालेल्या लिलावात कांदा बाजार भावात एक हजार रुपये ते दीड हजार रुपयांची वाढ झाली आहे.
बाजार अभ्यासकांनी सांगितल्याप्रमाणे, कालच्या अवकाळी पावसाचा आणि गारपिटीचा रांगडा आणि लाल कांदा पिकाला मोठा फटका बसणार आहे. यामुळे उत्पादनात मोठी घट येण्याची भीती आहे. एवढेच नाही तर कांदा बराकित साठवलेला उन्हाळी कांदा देखील या अवकाळी पावसामुळे आणि गारपिटीमुळे खराब होऊ शकतो अशी भीती व्यक्त केली जात आहे.
त्यामुळे आगामी काळात कांद्याची टंचाई भासणार आहे. हेच कारण आहे की आता कांदा बाजार भावात वाढ झाली आहे. काल राज्यातील प्रमुख कांदा उत्पादक जिल्ह्यांमध्ये अर्थातच नाशिक, धुळे, अहमदनगर, पुणे या भागात अवकाळी पावसाने धुडगूस घातला होता.
यामुळे लाल कांदा आणि रांगडा कांदा उत्पादन कमी होणार भीती व्यक्त केली जात आहे.खरे तर, सध्या बहुतांशी भागात लाल कांदा काढणीसाठी तयार झाला आहे तर काही ठिकाणी लाल कांद्याची हार्वेस्टिंग पूर्ण झाली असून अजूनही माल शेतातच पडला आहे.
दरम्यान याचं कांद्याला अवकाळी पावसाचा फटका बसला आहे. त्यामुळे गेल्या आठवड्यापर्यंत वाढत असलेली लाल कांद्याची आवक अचानक कमी झाली आहे. विशेष म्हणजे कांदा चाळीत साठवलेला, थोड्याफार प्रमाणात शिल्लक राहिलेला उन्हाळी कांदा देखील या पावसाळी वातावरणामुळे आणि ओलाव्यामुळे खराब होणार आहे.
या सर्वांच्या पार्श्वभूमीवर गेल्या आठवड्यात 3000 ते 3400 रुपये प्रति क्विंटल दरम्यान असणारे कांदा बाजारभाव आज एक हजार रुपयांनी वाढले आहेत. आज लासलगाव एपीएमसी मध्ये उन्हाळी कांद्याला कमाल 5231 आणि सरासरी चार हजार पाचशे रुपये भाव मिळाला आहे तर लाल कांद्याला कमाल 4 हजार 701 आणि सरासरी 4200 एवढा भाव मिळाला आहे.
मात्र या भाव वाढीचा शेतकऱ्यांना फायदा होणार नाहीये. अवकाळी पावसाने आणि गारपिटीने शेतकऱ्यांच्या मालाचे मोठे नुकसान केले असल्याने या भाव वाढीचा फायदा शेतकऱ्यांना होणार नसून भाव वाढ झाली असली तरी देखील शेतकरी सध्या नाराज असल्याचे चित्र आहे.