Kanda Bajarbhav : मित्रांनो खरं पाहता सप्टेंबर महिन्यात कांद्याला अतिशय कवडीमोल दर मिळत होता. मात्र तदनंतर कांदा दरात सुधारणा होत आहे. ऑक्टोबर मध्ये कांद्याला समाधानकारक बाजार भाव मिळत होता तर नोव्हेंबर मध्ये कांद्याला चांगला विक्रमी दर मिळू लागला आहे.
मात्र असे असले तरी या दरवाढीचा फायदा शेतकऱ्यांना खूपच कमी प्रमाणात होत असताना पाहायला मिळत आहे. शेतकरी बांधवांच्या मते राज्यातील बहुतांशी शेतकरी बांधवांनी सप्टेंबर पूर्वीच आपला बहुतांशी कांदा विक्री करून टाकला आहे. यामुळे सध्या शेतकऱ्यांकडे अल्प प्रमाणात कांदा शिल्लक आहे.
तसेच कांदा चाळीत साठवलेला कांदा गेल्या पाच ते सहा महिन्यांपासून चाळीत असल्यामुळे मोठ्या प्रमाणात सडू लागला आहे. याशिवाय पावसाच्या लहरीपणामुळे नवीन लाल कांदा लागवड देखील मोठी प्रभावित झाली आहे. जुलै आणि ऑगस्ट महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे खरीप हंगामातील कांदा लागवड लांबली तर परतीच्या पावसामुळे लागवड झालेला खरीप हंगामातील कांदा मोठ्या प्रमाणात खराब झाला.
अशा परिस्थितीत बाजारात अजूनही नवीन लाल कांदा चमकत नसल्याचे चित्र आहे. दरम्यान राज्यातील सोलापूर, जळगाव, नागपूर, पैठण, साक्री या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये लाल कांद्याची आवक होत आहे. उर्वरित कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये जुना उन्हाळी कांदा मोठ्या प्रमाणात दाखल होत आहे. दरम्यान आता शेतकऱ्यांजवळचा उन्हाळी कांदा संपुष्टात येण्याच्या मार्गावर असून येत्या काही दिवसात उन्हाळी कांदा आवक बाजारात कमी होणार आहे.
तसेच नवीन लाल कांदा बाजारात दाखल होण्यासाठी जानेवारी महिना उजाडणार असल्याचे चित्र आहे. ही सर्व परिस्थिती पाहता जानेवारी महिन्यापर्यंत कांदा दरात तेजी राहणार असल्याचे जाणकार लोकांकडून सांगितले जात आहे. दरम्यान काल झालेल्या लिलावात राज्यातील बहुतांशी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सरासरी बाजार भावात पुन्हा एकदा कपात झाली आहे.
या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सरासरी बाजार भावात झाली मोठी घसरण
मित्रांनो काल झालेल्या लिलावात औरंगाबाद एपीएमसी मध्ये कांद्याला मात्र 1,100 रुपये प्रतिक्विंटल एवढा सरासरी बाजार भाव मिळाला आहे. तसेच मंगळवेढा एपीएमसी मध्ये देखील सरासरी बाजार भावात घसरण झाली असून 1,220 रुपये प्रतिक्विंटल एवढा सरासरी बाजार भाव काल नमूद करण्यात आला आहे. विशेष बाब म्हणजे गेल्या काही दिवसांपासून ज्या सोलापूर एपीएमसी मध्ये कांद्याला चांगला विक्रमी बाजार भाव मिळत असून विक्रमी आवक होत आहे, त्या एपीएमसीमध्ये देखील सरासरी बाजार भावात घसरण झाली आहे.
काल सोलापूर एपीएमसी मध्ये झालेल्या लिलावात कांद्याला मात्र 1300 रुपये प्रति क्विंटल एवढा सरासरी बाजारभाव मिळाला आहे. जळगाव एपीएमसी मध्ये देखील कांद्याला 1162 रुपये प्रति क्विंटल एवढाच सरासरी बाजार भाव मिळाला आहे. चाळीसगाव एपीएमसीमध्ये देखील कांद्याला सरासरी बाजार भाव 1350 रुपये प्रतिक्विंटल एवढाच नमूद करण्यात आला आहे.
अहमदनगर जिल्ह्यात कांदा आला तेजीत
एकीकडे राज्यातील बहुतांशी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सरासरी बाजार भावात घसरण झाली आहे तर दुसरीकडे अहमदनगर जिल्ह्यात कांदा चांगलाच कडाडला आहे. अहमदनगर जिल्ह्यातील जवळपास सर्वच प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याला चांगला दर मिळत असल्याचे चित्र आहे.
संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समिती :- काल संगमनेर एपीएमसी मध्ये 2211 क्विंटल नंबर एक कांद्याचे आवक झाली होती. या एपीएमसीमध्ये झालेल्या लिलावात कांद्याला तब्बल 3311 रुपये प्रतिक्विंटलचा कमाल बाजारभाव मिळाला असून किमान बाजार भाव देखील 2211 रुपये प्रति क्विंटल नमूद करण्यात आला. सरासरी बाजार भाव 2705 रुपये प्रतिक्विंटल नमूद करण्यात आला आहे.
कर्जत कृषी उत्पन्न बाजार समिती :– कर्जत एपीएमसी मध्ये नंबर एकच्या कांद्याची 283 क्विंटल एवढी आवक झाली होती. या एपीएमसीमध्ये झालेल्या लिलावात कांद्याला तीनशे रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून 3200 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजारभाव मिळाला आहे. तसेच सर्वसाधारण बाजारभाव १,७०० रुपये नमूद करण्यात आला.
कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समिती :- कोपरगाव मध्ये काल झालेल्या लिलावात कांद्याला 2687 रुपये प्रतिक्विंटल एवढा कमाल बाजारभाव मिळाला असून 1850 रुपये प्रतिक्विंटल एवढा सरासरी बाजार भाव मिळाला आहे. मात्र या एपीएमसीमध्ये काल कांद्याला पाचशे रुपये प्रतिक्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला आहे.
श्रीरामपूर कृषी उत्पन्न बाजार समिती :- श्रीरामपूर एपीएमसीमध्ये काल 5274 क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक झाली. काल झालेल्या लिलावात या एपीएमसीमध्ये उन्हाळी कांद्याला अडीचशे रुपये प्रतिक्विंटल एवढा किमान बाजारभाव मिळाला असून 2350 रुपये प्रतिक्विंटल एवढा कमाल बाजारभाव मिळाला आहे. तसेच सर्वसाधारण बाजार भाव 1550 रुपये प्रति क्विंटल नमूद करण्यात आला आहे.