Kanda Bajarbhav : अहमदनगर जिल्हा हा कांदा उत्पादनासाठी विशेष ओळखला जातो. अहमदनगर जिल्ह्यातील जवळपास सर्वच तालुक्यात कांद्याची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. आता अहमदनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी कांदा दराबाबत एक धक्कादायक माहिती समोर येत आहे.
केवळ एका दिवसात कांदा दरात तब्बल पाचशे रुपयांची घसरण झाल्याने जिल्ह्यातील शेतकरी बांधव हाताश झाल्याचे चित्र आहे. खरं पाहता जिल्ह्यातील कोपरगाव तालुका हा उन्हाळी कांदा उत्पादनासाठी संपूर्ण जिल्ह्यात ख्यातीप्राप्त आहे.
आता कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 13 नोव्हेंबर रोजी झालेल्या लिलावात कांदा दरात पाचशे रुपयांची घसरण झाली आहे. यामुळे परिसरातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका बसत आहे. कोपरगाव एपीएमसी ही कांदा लिलावासाठी विशेष प्रसिद्ध असून या एपीएमसीवर कोपरगाव तालुक्यातील तसेच इतरही अन्य तालुक्यातील कांदा उत्पादक शेतकरी विसंबून आहेत.
अशा परिस्थितीत या एपीएमसी मध्ये झालेली कांदा दरातील घसरण शेतकऱ्यांसाठी चिंतेचा विषय बनत आहे. आम्ही आपल्या माहितीसाठी या ठिकाणी नमूद करू इच्छितो की, कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 12 नोव्हेंबर रोजी 8960 क्विंटल उन्हाळी कांद्याचे आवक झाली होती. 12 नोव्हेंबर रोजी झालेल्या लिलावात या एपीएमसी मध्ये कांद्याला पाचशे रुपये एवढा किमान बाजार भाव तसेच 3000 रुपये एवढा कमाल तर सर्वसाधारण बाजार भाव 2050 रुपये नमूद करण्यात आला होता.
मात्र 13 नोव्हेंबर रोजी अचानक कांदा दरात मोठी घसरण झाली. 13 नोव्हेंबर रोजी म्हणजे काल झालेल्या लिलावात कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 1680 क्विंटल एवढी उन्हाळी कांद्याची आवक झाली. काल झालेल्या लिलावात उन्हाळी कांद्याला 575 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून 2500 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजारभाव मिळाला तसेच सर्वसाधारण बाजार भाव 2090 रुपये प्रतिक्विंटल नमूद करण्यात आला.
म्हणजेच काल किमान बाजारभावात तसेच सरासरी बाजारभावात वाढ झाली असली तरी देखील कमाल बाजारभाव लक्षणीय कमी झाले आहेत. निश्चितच सरासरी बाजारभाव टिकून असल्याने शेतकऱ्यांना थोडासा दिलासा मिळत असला तरी देखील कमाल बाजारभावात झालेली घसरण शेतकऱ्यांसाठी चिंतेचा विषय आहे. यामुळे कांदा पुन्हा तोच वांदा करतो की काय असा प्रश्न शेतकऱ्यांच्या मध्यात विशेष चर्चिला जात आहे.