Kanda Anudan Maharashtra News : आपल्याकडे सरकारी काम आणि सहा महिने थांब अशी एक म्हण फार पूर्वीपासून प्रचलित आहे. सरकारी कामासाठी नेहमीच उशीर होत असल्याने आपण नेहमीच असं म्हणत असतो. आता कांदा अनुदानाबाबत देखील अशीच परिस्थिती पाहायला मिळत आहे.
कांदा अनुदान जाहीर करून जवळपास सहा महिन्यांचा कालावधी उलटला आहे तरीदेखील उत्पादक शेतकऱ्यांना अजूनही अनुदानाचा एक छदामही मिळालेला नाही. त्यामुळे सध्या राज्यातील शेतकऱ्यांमध्ये शासनाविरोधात प्रचंड संताप पाहायला मिळत आहे.
लेट खरीप हंगामातील कांदा फेब्रुवारी आणि मार्च या महिन्यात खूपच कवडीमोल दरात विकला गेला. त्यावेळी कांद्याला मात्र दोन ते तीन रुपये प्रति किलो असा भाव मिळत होता. अशा परिस्थितीत अनेक कांदा उत्पादक शेतकऱ्यांना कांदा पिकासाठी आलेला खर्च देखील भरून काढता आला नाही. यामुळे शेतकऱ्यांनी शासनाविरोधात निदर्शने केली.
अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी आंदोलने केलीत. काही ठिकाणी लिलाव बंद पाडण्यात आले. विपक्ष मधील नेत्यांनी देखील शासनाला कांद्याच्या मुद्द्यावरून घेरले. त्यावेळी सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातं कांद्याचा मुद्दा प्रचंड गाजला आणि उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी अनुदानाची मागणी करण्यात आली.
या पार्श्वभूमीवर सुरुवातीला शिंदे सरकारने 300 रुपये प्रति क्विंटल एवढे अनुदान जाहीर केले. मात्र जाहीर करण्यात आलेले अनुदान खूपच कमी असल्याने शिंदे सरकारची मोठी किरकिरी झाली. यामुळे शासनाने आपला आधीचा निर्णय फिरवत कांदा उत्पादक शेतकऱ्यांना 350 रुपये प्रति क्विंटल 200 क्विंटलच्या मर्यादेत अनुदान जाहीर केले.
अनुदान जाहीर केल्यानंतर जवळपास 14 दिवसानंतर याचा अधिकृत शासन निर्णय शासनाने निर्गमित केला. शासन निर्णय निर्गमित झाल्यानंतर कांदा उत्पादकांना अनुदानासाठी मागणी प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्यात. यानुसार शेतकऱ्यांनी कांदा अनुदान मागणीचे अर्ज सादर केलेत.
मात्र अर्ज सादर होऊनहीं जवळपास साडेतीन महिन्यांचा कालावधी उलटला आहे तरीदेखील अनुदान मिळालेले नाही. विशेष बाब म्हणजे नुकत्याच झालेल्या पावसाळी अधिवेशनात राज्याचे पणन मंत्री अब्दुल सत्तार यांनी 15 ऑगस्ट पूर्वी राज्यातील शेतकऱ्यांना कांदा अनुदानाचा पैसा मिळेल अशी मोठी घोषणा केली होती.
मात्र ही घोषणा आता फोल ठरली आहे. कारण की, राज्यातील एकाही शेतकऱ्याला अजून कांदा अनुदानाचा पैसा प्राप्त झालेला नाही. त्यामुळे सध्या राज्यातील शेतकरी या मुद्द्यावर आक्रमक बनले असून आता पुन्हा एकदा शेतकरी आंदोलन करणार असे सांगितले जात आहे.
दरम्यान कांदा उत्पादकांना ऑगस्ट महिन्याच्या अखेरपर्यंत अनुदानाचा पैसा मिळेल अशी माहिती काही मीडिया रिपोर्ट मधून समोर आली आहे. यामुळे आता कांदा अनुदानाचा पैसा शेतकऱ्यांना केव्हा वितरीत होतो हे विशेष पाहण्यासारखे राहणार आहे.