Kanda Anudan Maharashtra News : राज्यातील शेतकऱ्यांना फेब्रुवारी आणि मार्च या काळात खूपच कवडीमोल दरात कांदा विकावा लागला. यामुळे शेतकऱ्यांवर आर्थिक संकट कोसळले. कांदा उत्पादित करण्यासाठी येणाऱ्या खर्चापेक्षा कमी भाव मिळाला असल्याने शेतकऱ्यांना उत्पादन खर्च वसूल करता आला नाही. यातील काही लोकांना तर माल बाजारात नेण्यासाठी आलेला वाहतुकीचा खर्च देखील भरून काढता आला नाही.
परिणामी व्याजाच्या पैशाने कांदा लागवड केलेले शेतकरी कर्जबाजारी झाले आहेत. अशा परिस्थितीत राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळावा म्हणून कांदा अनुदानाची मागणी करण्यात आली. शासनाने देखील शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी 350 रुपये प्रतिक्विंटल प्रमाणे अनुदान देण्याचे जाहीर केले. यासाठीचा शासन निर्णय अर्थसंकल्पीय अधिवेशन झाल्यानंतर लगेचच निर्गमित करण्यात आला.
शासन निर्णय निर्गमित झाल्यानंतर अनुदान मागणीसाठी अर्ज सादर करण्याचे आवाहन शेतकऱ्यांना करण्यात आले. यानुसार शेतकऱ्यांनी अर्ज सादर केले असून आता लवकरच अनुदान वितरित केले जाणार आहे. मात्र कांदा अनुदानासाठी लावून देण्यात आलेल्या जाचक अटीमुळे अनेक शेतकरी या लाभापासून वंचित राहणार असे चित्र आहे.
दरम्यान राज्यातील प्रमुख कांदा उत्पादक जिल्हा म्हणून ख्याती प्राप्त असलेल्या नाशिक जिल्ह्यातील बागलाण तालुक्याच्या अपात्र कांदा उत्पादक शेतकऱ्यांना देखील कांदा अनुदान देण्याचा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, कांदा अनुदानासाठी पिकाची एकरी उत्पादकता 90 क्विंटल एवढी ठेवण्यात आली आहे. मात्र प्रत्यक्षात शेतकरी 200 ते 250 क्विंटल कांद्याचे उत्पादन काढतात.
अशा परिस्थितीत ज्या शेतकऱ्यांनी कांद्याचे अधिक उत्पादन दाखवले आहे त्या शेतकऱ्यांचे अर्ज बाद केले जात होते. यात बागलाण तालुक्यातील देखील बहुसंख्य शेतकऱ्यांचे अर्ज बाद झालेत. दरम्यान तालुक्यातील शेतकऱ्यांनी याबाबत आमदार दिलीप बोरसे यांच्याकडे पाठपुरावा केला. बोरसे यांनी देखील याची दखल घेतली आणि ही कैफियत कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्यासमोर मांडली. आता मुंडे यांनी देखील यावर सकारात्मक निर्णय घेतला आहे.
कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी तालुक्यातील या अपात्र ठरवण्यात आलेल्या शेतकऱ्यांना देखील अनुदान मिळावे यासाठी आदेश निर्गमित केले आहेत. याबाबत अतिरिक्त मुख्य सचिव यांना कृषिमंत्री महोदय यांनी निर्देश दिले आहेत. यामुळे प्रमुख कांदा उत्पादक म्हणून ओळख असलेल्या बागलाण तालुक्यातील अपात्र ठरलेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळणार असल्याचा आशावाद व्यक्त होत आहे.