Kanda Anudan Maharashtra News : अर्थसंकल्पीय अधिवेशनात कांदा उत्पादकांना दिलासा देण्यासाठी 350 रुपये प्रति क्विंटल प्रति शेतकरी दोनशे क्विंटलच्या मर्यादित शासनाने कांदा अनुदान योजना जाहीर केली आहे. मात्र सरकारी काम सहा महिने थांब, आता कांदा अनुदान जाहीर करून सहा महिन्याचा काळ उलटला तरी देखील पात्र शेतकऱ्यांना हे अनुदान मिळालेले नाही.
परिणामी शेतकऱ्यांमध्ये शासनाविरोधात रोष पाहायला मिळत आहे. नुकत्याच पार पडलेल्या पावसाळी अधिवेशनात देखील कांदा अनुदान लवकरात लवकर वितरित करण्यासाठी विधिमंडळात गदारोळ पाहायला मिळाला होता. दरम्यान, विधिमंडळात मंत्री अब्दुल सत्तार यांनी 15 ऑगस्टपर्यंत राज्यातील शेतकऱ्यांना कांदा अनुदानाचा पैसा मिळून जाईल असं सांगितलं होतं.
परंतु शासनाचा हा केवळ वेळकाढूपणा होता. कारण की, अजूनही शेतकऱ्यांना अनुदान मिळालेले नाही. अशातच मात्र या अनुदानासंदर्भात एक महत्त्वाची आणि अतिशय मोठी बातमी समोर आली आहे. महाराष्ट्र राज्य शासनाच्या वित्त विभागाने पणन विभागाला कांदा अनुदान वितरित करण्यासाठी तब्बल 465 कोटी 99 लाख रुपयांचा निधी वितरित केला आहे.
हा निधी आता पण विभागाकडे वितरित झाला असल्याने पणन विभाग राज्यातील कांदा अनुदानासाठी पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यात लवकरच पैसे पाठवणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पुढील आठवड्यात कांदा अनुदानाची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होऊ शकते.
कांदा अनुदानाची रक्कम दोन टप्प्यात
हाती आलेल्या माहितीनुसार, राज्यातील 23 जिल्ह्यातील शेतकरी कांदा अनुदानासाठी पात्र आहेत. कांदा अनुदान दोन टप्प्यात पात्र शेतकऱ्यांना दिले जाणार आहे. पहिल्या टप्प्यात 13 जिल्ह्यातील सर्वच्या सर्व शेतकऱ्यांना म्हणजेच 100% शेतकऱ्यांना अनुदान मिळणार आहे तर उर्वरित दहा जिल्ह्यातील 53% शेतकऱ्यांना अनुदानाची रक्कम दिली जाणार आहे.
खरंतर कांदा अनुदानासाठी पावसाळी अधिवेशनात 550 कोटी रुपये पुरवणी मागणीने मंजूर करण्यात आले आहेत. प्रत्यक्षात शेतकऱ्यांना 844 कोटींपेक्षा अधिकची रक्कम अनुदान म्हणून आवश्यक आहे.
दरम्यान या 844 कोटी पैकी पहिल्या टप्प्यात 465 कोटी 99 लाख रुपयांचा निधी राज्य सरकारकडून वितरित करण्यात आला आहे. दुसऱ्या टप्प्यातील निधी देखील लवकरच मंजूर करून वितरित केला जाईल आणि सर्व शेतकऱ्यांना अनुदानाचा पैसा मिळेल असा आशावाद यावेळी व्यक्त केला जात आहे.