Kanda Anudan Maharashtra : राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी बातमी समोर येत आहे. जस की आपणास ठाऊकच आहे की, या चालू वर्षात कांदा बाजारातील लहरीपणा शेतकऱ्यांसाठी मोठा मारक ठरला आहे. या चालू वर्षात फेब्रुवारी आणि मार्च महिन्यामध्ये कांद्याला खूपच कवडीमोल दर मिळाला होता.
यामुळे उत्पादक शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला. काही शेतकऱ्यांना तर कांदा पिकासाठी आलेला उत्पादन खर्च देखील भरून काढता आला नाही. तसेच काही शेतकऱ्यांना माल बाजारात नेण्यासाठी आलेला खर्च देखील मिळाला नाही. यामुळे शेतकरी शासनाविरोधात आक्रमक बनले होते. अनेक शेतकऱ्यांनी त्यावेळी शासनाला वेठीस धरले.
त्यावेळी सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात देखील हा मुद्दा गाजला होता. विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात कांदा उत्पादकांना दिलासा देण्यासाठी अनुदानाची मागणी करण्यात आली होती. या मागणीच्या पार्श्वभूमीवर शिंदे-फडणवीस सरकारने कांदा उत्पादकांना 350 रुपये प्रति क्विंटल अनुदान प्रति शेतकरी 200 क्विंटलच्या मर्यादेत देण्याचे जाहीर केले.
मात्र आता या अनुदानाची घोषणा होऊन जवळपास सहा महिन्यांचा कालावधी उलटला आहे तरीदेखील प्रत्यक्षात शेतकऱ्यांना अनुदान मिळालेले नाही. परंतु शासनाच्या वित्त विभागाकडून पणन विभागाला अनुदानासाठी आवश्यक असलेल्या 844 कोटी 56 लाख 81 हजार 775 रुपयांपैकी 465 कोटी 99 लाख रुपये वितरित करण्यात आला आहे.
उर्वरित निधी दुसऱ्या टप्प्यात दिला जाणार आहे. तसेच उपलब्ध करून देण्यात आलेल्या निधीच्या वाटपासाठी सूत्र देखील ठरवण्यात आले आहे. या सूत्रानुसार आता जिल्हा उपनिबंधकांना शेतकऱ्यांना कांदा अनुदानाचा पैसा वितरित करता येणार आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की राज्यातील एकूण 23 जिल्ह्यातील शेतकरी कांदा अनुदानासाठी पात्र आहे.
या 23 जिल्ह्यापैकी 13 जिल्ह्यातील शंभर टक्के शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यात अनुदानाची रक्कम मिळणार आहे तर दहा जिल्ह्यातील 53.94% शेतकऱ्यांना अनुदानाचा पैसा मिळणार आहे. या दहा जिल्ह्यातील उर्वरित शेतकऱ्यांना अनुदानाचा पैसा दुसऱ्या टप्प्यात वितरित होणार आहे.
कांदा अनुदानाचा पहिल्या टप्प्यातील पैसा वितरित झाल्यानंतर 443 कोटी 37 लाख 33 हजार 994 रुपये एवढा उर्वरित निधी दुसऱ्या टप्प्यात शेतकऱ्यांना देऊ केला जाणार आहे. विशेष बाब म्हणजे आता पणन विभागाला वित्त विभागाकडून अनुदान वितरित करण्यासाठी निधी उपलब्ध झाला असल्याने पणन विभागाने हा अनुदानाचा पैसा शेतकऱ्यांना वितरित करण्यासाठी कारवाई सुरू केली आहे.
या पार्श्वभूमीवर कांदा अनुदानासाठी स्वतंत्र पोर्टल विकसित करण्यात आले असून यात आता पात्र शेतकऱ्यांच्या याद्या अपलोड होणार आहेत. जिल्हा उपनिबंधक या शेतकऱ्यांच्या याद्या संबंधित पोर्टलवर ऑनलाईन अपडेट करणार आहेत. यासाठी जिल्हा उपनिबंधकांना लॉगिन आयडी आणि पासवर्ड दिला जाणार आहे. जिल्हा उपनिबंधकांनी या याद्या अपलोड केल्यानंतर अनुदानाचा पैसा संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग होणार आहे.
कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार 100% अनुदान
ज्या जिल्ह्यासाठी दहा कोटी पेक्षा कमी रक्कम लागणार आहे अशा जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना कांदा अनुदानाची 100% रक्कम दिली जाणार आहे. नागपूर, रायगड, सांगली, सातारा, ठाणे, अमरावती, बुलडाणा, चंद्रपूर, वर्धा, लातूर यवतमाळ, अकोला व वाशिम या तेरा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कांदा अनुदानाची शंभर टक्के रक्कम पहिल्याच टप्प्यात मिळणार आहे.
कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार दोन टप्प्यात अनुदान
सोलापूर, नाशिक, पुणे, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर, धुळे, जळगाव, कोल्हापूर, बीड व अहमदनगर या दहा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अनुदानाची रक्कम दोन टप्प्यात मिळणार आहे.
या दहा जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी दहा कोटी पेक्षा अधिक अनुदानाची रक्कम आवश्यक असल्याने यासंबंधीत जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दोन टप्प्यात अनुदानाची रक्कम दिली जाणार आहे. या दहा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यात 53.94% आणि दुसऱ्या टप्प्यात 46.06% रक्कम वितरित होणार आहे.