Kanda Anudan Maharashtra : राज्यातील शेतकऱ्यांना या चालू वर्षातील फेब्रुवारी आणि मार्च या दोन महिन्याच्या काळात खूपच कवडीमोल दरात आपला कांदा विकावा लागला. सोन्यासारखा कांदा अगदी कमी दरात द्यावा लागला यामुळे शेतकरी संकटात आलेत.
यामुळे शेतकऱ्यांनी त्यावेळी ठिकठिकाणी आंदोलने सुरू केलीत, काही ठिकाणी लिलाव बंद करण्यात आले, काही ठिकाणी रस्ता रोको झाला तसेच त्यावेळी सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात देखील कांद्याचा मुद्दा गाजला. विरोधी पक्षातील नेत्यांनी कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी अनुदानाची मागणी केली.
विधिमंडळाबाहेर शेतकरी आणि शेतकरी संघटनांनी शासनावर दबाव तयार केला. परिणामी शिंदे फडणवीस सरकारने कांदा उत्पादकांना दिलासा देण्यासाठी 350 रुपये प्रति क्विंटल अनुदान प्रति शेतकरी 200 क्विंटलच्या मर्यादेत जाहीर केले आहे.
यासाठी शेतकऱ्यांनी कांदा अनुदान मागणीचे अर्ज सादर केले आहेत. या अर्जांची पडताळणी देखील पूर्ण झाली आहे. मात्र असे असले तरी अर्थसंकल्पीय अधिवेशनात घोषित झालेले कांदा अनुदान अजूनही शेतकऱ्यांना मिळालेले नाही.
सरकारी काम आणि सहा महिने थांब असच या अनुदानाच झालं आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये शासनाविरोधात पुन्हा एकदा संताप पाहायला मिळत आहे. खरंतर 15 ऑगस्ट पर्यंत शेतकऱ्यांना कांदा अनुदान मिळेल अशी ग्वाही राज्याचे पणन मंत्री अब्दुल सत्तार यांनी दिली होती.
मात्र 15 ऑगस्ट उलटून आता तीन-चार दिवस झालेत तरीही अनुदानाचा पैसा शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झालेला नाही यामुळे मंत्री महोदय यांचे हे आश्वासन निव्वळ वेळ काढूपणा होता की काय असा प्रश्न उपस्थित होत आहे. अशातच मात्र कांदा अनुदानाबाबत एक महत्त्वाची माहिती समोर येत आहे.
पणन मंत्री अब्दुल सत्तार यांनीच याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. त्यांनी सांगितल्याप्रमाणे पावसाळी अधिवेशनामध्ये कांदा अनुदानासाठी 550 कोटी रुपयांची पुरवणी मागणी मंजूर करून घेण्यात आली आहे.दरम्यान या मंजूर करण्यात आलेल्या 550 कोटी रुपयांपैकी 465.99 कोटी रुपये वित्त विभागाच्या माध्यमातून पणन विभागाला देण्यात आले आहेत.
आता हा निधी पणन विभागाच्या माध्यमातून राज्यातील कांदा अनुदानासाठी पात्र कांदा उत्पादकांना दिला जाणार आहे. अर्थातच येत्या काही दिवसात कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अनुदानाचा पैसा मिळणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार राज्यातील 23 जिल्ह्यातील कांदा उत्पादकांना हा निधी वितरित होणार आहे.
मात्र या 23 पैकी 13 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना शंभर टक्के अनुदानाचा पैसा मिळणार आहे तर दहा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना निम्म्याच पैसा मिळणार आहे. म्हणजेच दहा जिल्ह्यातील निम्म्याच शेतकऱ्यांना अनुदानाचा पैसा मिळेल आणि निम्म्या शेतकऱ्यांना अनुदानाचा पैसा दुसऱ्या टप्प्यात वितरित होणार आहे.
कोणत्या जिल्ह्यातील शंभर टक्के शेतकऱ्यांना मिळणार कांदा अनुदान
मिळालेल्या माहितीनुसार राज्यातील ज्या 13 जिल्ह्यात कांदा अनुदानाची रक्कम दहा कोटी पेक्षा कमी आहे अशा 13 जिल्ह्यातील 100% शेतकऱ्यांना अनुदानाची रक्कम मिळणार आहे.
नागपूर, रायगड, सांगली, सातारा, ठाणे, अमरावती, बुलढाणा, चंद्रपूर, वर्धा, लातूर, यवतमाळ, अकोला आणि वाशिम या तेरा जिल्ह्यातील कांदा अनुदानासाठी पात्र ठरलेल्या सर्व शेतकऱ्यांना अनुदानाची रक्कम वितरित केली जाणार आहे.
या दहा जिल्ह्यातील निम्म्याच शेतकऱ्यांना मिळणार अनुदान
ज्या जिल्ह्यात कांदा अनुदानासाठी दहा कोटी पेक्षा अधिक पैशांची गरज आहे अशा जिल्ह्यात दोन टप्प्यात कांदा अनुदान वितरित केले जाणार आहे. म्हणजेच पहिल्या टप्प्यात निम्म्या शेतकऱ्यांना अनुदान मिळेल आणि दुसऱ्या टप्प्यात निम्म्या शेतकऱ्यांना अनुदान दिले जाणार आहे.
नाशिक, उस्मानाबाद, पुणे, सोलापूर,अहमदनगर, औरंगाबाद, धुळे, जळगाव, कोल्हापूर आणि बीड या दहा जिल्ह्यातील फक्त निम्म्याच शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यात अनुदान मिळणार आहे. उर्वरित शेतकऱ्यांना दुसऱ्या टप्प्यात अनुदान दिले जाणार आहे.