Kanda Anudan 2023 : महाराष्ट्र राज्य शासनाने फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात कवडीमोल दरात शेतकऱ्यांना कांदा विकावा लागला असल्याने शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी अनुदानाची घोषणा केली आहे. मार्च महिन्यात झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात शिंदे-फडणवीस सरकारने शेतकऱ्यांना 350 रुपये प्रतिक्विंटल प्रति शेतकरी 200 क्विंटलच्या मर्यादेत अनुदान जाहीर केले आहे.
1 फेब्रुवारी 2023 ते 31 मार्च 2023 या कालावधीत राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती, खासगी बाजार समिती आणि नाफेडकडे ज्या शेतकऱ्यांनी कांदा विकला असेल तेच शेतकरी अनुदानासाठी पात्र राहणार आहेत. मात्र अनुदानाची घोषणा होऊन जवळपास सहा महिन्यापेक्षा अधिकचा काळ उलटला आहे.
तरीही अजून अनुदानाचा एक रुपयाही शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेला नाही. यामुळे शेतकऱ्यांमध्ये सध्या संतापाचे वातावरण पाहायला मिळत आहे. राज्य शासनाच्या वित्त विभागाने कांदा अनुदानासाठी आवश्यक असलेले 857 कोटी रुपयांपैकी 465 कोटी 90 लाख रुपयाचा निधी पणन विभागाकडे दिला आहे.
तसेच राज्य शासनाने कांदा अनुदानासाठी पात्र ठरलेल्या तेरा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना शंभर टक्के अनुदानाची रक्कम आणि दहा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दोन टप्प्यात अनुदानाची रक्कम देण्याचे जाहीर केले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार ज्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी कांदा अनुदान हेतू 10 कोटी रुपयांपेक्षा कमी रकमेची गरज आहे अशा तेरा जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अनुदानाची शंभर टक्के रक्कम वितरित होणार आहे.
मात्र ज्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांची कांदा अनुदानासाठीची रक्कम 10 कोटी रुपयांपेक्षा अधिक आहे अशा राज्यातील दहा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अनुदानाची रक्कम दोन टप्प्यात मिळणार असल्याची माहिती समोर आली आहे.
कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार शंभर टक्के रक्कम
नागपूर, रायगड, सांगली, सातारा, ठाणे, अमरावती, बुलडाणा, चंद्रपूर, वर्धा, लातूर, यवतमाळ, अकोला, जालना, वाशीम या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना शंभर टक्के रक्कम मिळणार आहे. म्हणजे या शेतकऱ्यांना एकाच टप्प्यात पूर्ण अनुदान मिळणार आहे.
कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार दोन टप्प्यात अनुदान
धुळे, कोल्हापूर, औरंगाबाद, उस्मानाबाद, बीड, जळगाव, पुणे, सोलापूर, नगर व नाशिक या प्रमुख कांदा उत्पादक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दोन टप्प्यात अनुदानाची रक्कम मिळणार आहे. विशेष म्हणजे ज्या शेतकऱ्यांची अनुदानाची रक्कम दहा हजारापेक्षा अधिक आहे त्यांना पहिल्या टप्प्यात दहा हजार रुपये एवढी रक्कम मिळणार असल्याचे सांगितले जात आहे.