Kalyan Ring Road : मुंबई शहरात आणि उपनगरात गेल्या काही दशकांमध्ये वाहतूक कोंडीची समस्या एक कॉमन गोष्ट बनली आहे. मुंबई शहराचा जेवढ्या झपाट्याने विस्तार झाला आहे तेवढ्याच वेगाने मुंबई लगत असलेली शहरे देखील विस्तारू लागली आहे. मुंबईला लगतच्या शहरांचा विकास हा टॉप गियर मध्ये सुरु आहे.
यामुळे मुंबई लगत असलेल्या शहरांमध्ये देखील मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी पाहायला मिळत आहे. दरम्यान ही वाहतूक कोंडी फोडण्यासाठी शासन आणि प्रशासनाच्या माध्यमातून विविध प्रयत्न देखील केले जात आहेत.
याच प्रयत्नाचा एक भाग म्हणून तसेच डोंबिवली, कल्याण, भिवंडी, आंबिवली, टिटवाळा या ठाणे जिल्ह्यातील पाच शहरांमधील वाहतूक कोंडीची समस्या कायमची निकाली काढण्यासाठी एम एम आर डी ए कडून कल्याण ते टिटवाळा दरम्यान 33 किलोमीटर लांबीचा रिंग रोड तयार केला जात आहे.
हा रिंग रोड या भागातील वाहतूक कोंडी बऱ्यापैकी कमी करेल असा आशावाद व्यक्त केला जात आहे. हा Kalyan Ring Road कल्याण – डोंबिवली – टिटवाळाला बायपास करणार असल्याने या परिसरातील ट्रॅफिक जाम समस्या कायमची निकाली निघेल असे एमएमआरडीएला वाटत आहे.
दरम्यान या कल्याण रिंग रोड बाबत एक अतिशय महत्त्वाचे आणि मोठे अपडेट समोर आले आहे. ते म्हणजे हा नवीन रिंग रोड आता अहमदनगर महामार्गाला कनेक्ट केला जाणार आहे. यामुळे या रिंग रोडची व्यापकता वाढणार असून कल्याण-अहमदनगर महामार्गाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना देखील या रिंग रोडचा फायदा मिळणार आहे.
हा रिंग रोड एकूण सात टप्प्यात तयार केला जाणार होता. मात्र आता या रिंग रोडला कल्याण अहमदनगर राष्ट्रीय महामार्गाला जोडण्याची नियोजन आखण्यात आले आहे. यामुळे हा रिंग रोड एकूण 8 टप्प्यात तयार केला जाणार असून आठव्या टप्प्या अंतर्गत रिंग रोड अहमदनगर महामार्गाला जोडणे प्रस्तावित करण्यात आले आहे.
या रिंग रोडच्या सध्याच्या कामाचा विचार केला असता टप्पा एक ते टप्पा तीन पर्यंत सध्या भूसंपादन सुरू आहे. पण टप्पा 4 ते 7 चे बांधकाम युद्ध पातळीवर केले जात आहे. या चार टप्प्यांचे आत्तापर्यंत 80 टक्के एवढे बांधकाम पूर्ण झाले आहे. उर्वरित बांधकाम देखील जलद गतीने पूर्ण केले जात आहे.
यामुळे हा संपूर्ण कल्याण रिंग रोड 2025 पर्यंत पूर्ण होईल अशी माहिती समोर येत आहे. हा कल्याण टिटवाळा रिंग रोड आता टप्पा 8 अंतर्गत रुंदे येथील रस्ता पुढे कल्याण-अहमदनगर राष्ट्रीय महामार्गाला गोवेली येथे जोडला जाणार असे वृत्त समोर आले आहे.
कसा असेल रूटमॅप ?
कल्याण-टिटवाळा रिंग रोड हा 33.30 किलोमीटर लांबीचा राहणार आहे. आता हा रिंग रोड कल्याण महामार्गाला जोडला जाणार आहे. या प्रकल्पांतर्गत तयार होणारा रस्ता हा 30 ते 45 मीटर रुंदीचा राहील. याचे काम एमएमआरडीए अर्थातच मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून केले जाणार आहे.
या प्रकल्पासाठी जवळपास 1425 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. हा kalyan Ring Road टिटवाळा, कल्याण, ठाणे, भिवंडी इत्यादी ठिकाणी जाणाऱ्या प्रवाशांसाठी उपयुक्त ठरणार आहे. हा रोड कल्याण आणि डोंबिवली विभागातील शहरांतर्गत वाहतूक कमी करणार आहे.