Indian Railway Ticket Discount : भारतात एका शहरातुन दुसऱ्या शहरात प्रवास करण्यासाठी एसटी महामंडळाच्या बसचा आणि रेल्वेचा सर्वाधिक वापर होतो. विशेष म्हणजे एसटी महामंडळाच्या बसपेक्षा रेल्वेचा प्रवासा गतिमान असल्याने अनेकजण याच प्रवासाला पसंती दाखवतात. रेल्वेने लांब पल्ल्याचा प्रवास देखील लवकरात लवकर करता येतो आणि या प्रवासासाठी खूपच कमी पैसे लागतात.
यामुळे मध्यमवर्गीय नेहमीच या प्रवासाला पसंती दाखवतात. विशेष म्हणजे भारतीय रेल्वेचे जाळे हे देशाच्या कानाकोपऱ्यात विस्तारलेले आहे. फक्त देशातच नाही तर आपल्या शेजारील राष्ट्रात देखील हे जाळे पसरलेले आहे. यामुळे याने केवळ देशातच प्रवास करता येतोय असं नाही तर रेल्वेने थेट विदेशात देखील प्रवास करता येतोय. हेच कारण आहे की, रेल्वेच्या प्रवाशांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.
विशेष म्हणजे भारतीय रेल्वेच्या माध्यमातून आपल्या प्रवाशांना नेहमीच वेगवेगळ्या सोयी-सुविधा देखील उपलब्ध करून दिल्या जात आहेत. तसेच शासनाच्या माध्यमातून रेल्वे मंत्रालय रेल्वेमध्ये प्रवास करताना काही नागरिकांना सवलतही देत आहे. देशातील काही नागरिकांना तिकीट दरात सवलत मिळत आहे. यामध्ये ज्येष्ठ नागरिकांना आणि अपंग लोकांना रेल्वेच्या प्रवासादरम्यान तिकीट दरात सवलत दिली जात आहे.
काही भागात विद्यार्थ्यांना देखील सवलत दिली जाते. याव्यतिरिक्त रेल्वेने प्रवास करण्यासाठी काही गंभीर आजाराशी झुंज देणाऱ्या रुग्णांना देखील सवलत दिली जात आहे. अशा परिस्थितीत, आज आपण कोणत्या आजाराने ग्रसित रुग्णांना रेल्वेच्या तिकीट दरात सवलत मिळते याबाबत थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
कोणत्या रुग्णांना मिळते सवलत
भारतीय रेल्वे कडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार, कॅन्सरच्या रुग्णांना आणि त्यांच्यासोबत प्रवास करणाऱ्या एका व्यक्तीला ही सवलत मिळते. या आजाराशी लढा देणाऱ्या रुग्णाला फर्स्ट एसी कार, फर्स्ट क्लास, सेकंड क्लासमध्ये 75% सूट दिली जाते. तसेच स्लीपर आणि एसी-3 टियरमध्ये 100 टक्के सूट आहे आणि फर्स्ट एसी आणि एसी-2 टियरमध्ये 50% सूट उपलब्ध आहे. रुग्णासोबत असलेल्यांना स्लीपर आणि AC-3 सीटवर 75 टक्के सूट मिळते.
थॅलेसेमियाचे रुग्ण, हार्ट ऑपरेशन साठी जाणारा रुग्ण, इतर कोणत्याही ऑपरेशनसाठी जाणारे रुग्ण, डायलिसिससाठी जाणाऱ्या मूत्रपिंड रुग्णांना आणि त्यांच्यासोबत असलेल्या एका नातेवाईकाला सेकंड स्लीपर, फर्स्ट क्लास, एसी-3 टायर, एसी चेअर कार, फर्स्ट आणि एसी-2 टायरमध्ये 50 टक्के सवलत मिळत असल्याची माहिती देण्यात आली आहे.
क्षयरोग म्हणजे टीबी असलेल्या रुग्णांसाठी आणि त्यांच्यासोबत असलेल्या नातेवाईकांना सेकंड स्लीपर आणि प्रथम श्रेणी कोच मध्ये 75 टक्के तिकीट दरात सवलत मिळते. उपचारासाठी जाणाऱ्या एड्स रुग्णांना सेकंड क्लासने प्रवास करताना तिकीट दरात 50% सूट मिळते. तसेच अॅनिमियाच्या रुग्णांना स्लीपर, एसी चेअर कार, एसी-३ टायर आणि एसी-२ टायरमध्ये प्रवास करताना तिकीट दरात 50 टक्के सूट देण्याचे प्रावधान आहे.
हिमोफिलियाच्या रुग्णांना उपचारासाठी जाताना सेकंड, स्लीपर, फर्स्ट क्लास, एसी-3 टायर, एसी चेअर कारमध्ये प्रवास करताना तिकीट दरात 75 टक्के एवढी सूट दिली जाते. तसेच त्यांच्या सोबत असलेल्या नातेवाईकांना देखील ही सूट मिळते. कुष्ठरोग असलेल्या रुग्णांना देखील रेल्वेने प्रवास करताना द्वितीय स्लीपर आणि प्रथम श्रेणीमध्ये ७५ टक्के सवलत दिली जात असल्याची माहिती देण्यात आली आहे.