Havaman Andaj : महाराष्ट्रातील हवामानात गेल्या काही दिवसांपूर्वी मोठा बदल झाला आहे. महाराष्ट्रासहित देशातील अनेक राज्यांमधील हवामानात मोठा बदल झाला असून याचा परिणाम म्हणून देशातील काही राज्यांमध्ये ढगाळ हवामान तयार झाले आहे आणि अवकाळी पावसाची हजेरी लागत आहे.
देशाच्या उत्तरेकडील राज्यांमध्ये तीव्र थंडीचा जोर पाहायला मिळत आहे तर दक्षिणेकडील राज्यांमध्ये मुसळधार पाऊस सुरु आहे. म्हणजे राज्यात विरोधाभासी वातावरण पाहायला मिळत आहे.
दरम्यान या हवामान बदलामुळे राज्यातील शेतकऱ्यांच्या शेती पिकांवर मोठा विपरीत परिणाम झाला आहे. त्यामुळे रब्बी हंगामातील गहू, हरभरा या पिकांसमवेतच कांदा आणि फळबाग पिकांना देखील मोठा फटका बसला आहे.
अशा परिस्थितीत राज्यातील शेतकऱ्यांच्या माध्यमातून महाराष्ट्रातील पावसाळी वातावरण केव्हा निवळणार हा महत्त्वाचा सवाल उपस्थित केला जात होता.
दरम्यान याच पार्श्वभूमीवर भारतीय हवामान विभागाने राज्यातील पावसाळी वातावरणाबाबत एक अतिशय महत्त्वाची अपडेट दिली आहे. भारतीय हवामान खात्याने म्हटल्याप्रमाणे महाराष्ट्रातील पावसाचा जोर आता कमी होणार आहे.
आय एम डी ने म्हटल्याप्रमाणे आज राज्यातील काही भागांमध्ये ढगाळ हवामान कायम राहणार आहे. तसेच आज काही भागात विरळ स्वरूपात धुके पाहायला मिळणार आहेत.
उद्यापासून मात्र राज्यातील हवामान पुन्हा एकदा पूर्व पदावर येण्याची शक्यता आहे. उद्यापासून आकाश निरभ्र राहील असा अंदाज हवामान खात्याने दिला आहे.
याचा परिणाम म्हणून आता महाराष्ट्रात थंडीचा जोर वाढणार आहे. आय एम डी ने म्हटल्याप्रमाणे राज्यातील बहुतांश भागातील किमान तापमानात मोठी घट येणार आहे. किमान तापमान चार ते पाच अंश सेल्सिअसने कमी होणार असा अंदाज आहे.
यामुळे प्रामुख्याने विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात गारठा वाढेल असे सांगितले जात आहे. पुण्यात देखील येत्या काही दिवसात गारठा वाढण्याची शक्यता आहे. पण, स्कायमेट या खाजगी हवामान अंदाज वर्तवणाऱ्या संस्थेने मात्र महाराष्ट्रात आजही रिमझिम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवली आहे.
तसेच स्कायमेटने देशातील मध्य प्रदेश, तामिळनाडू, केरळ, लक्षद्वीप, तेलंगणा, कर्नाटक आणि छत्तीसगडच्या काही भागांमध्ये पाऊस हजेरी लावणार अशी शक्यता वर्तवली आहे. याशिवाय, अंदमान आणि निकोबार बेटांवर सुद्धा किरकोळ पाऊस पडेल असे सदर संस्थेने म्हटलेले आहे.