Havaman Andaj : ज्येष्ठ हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी नुकत्याच दोन दिवसांपूर्वी एक हवामान अंदाज जारी केला. यात त्यांनी 25 तारखेपासून महाराष्ट्रात पाऊस सुरू होणार असा अंदाज दिला. 25 ते 28 दरम्यान पाऊस पडणार असे डख यांचे म्हणणे आहे. दरम्यान आता हवामान विभागाने देखील महाराष्ट्रात पावसाची शक्यता वर्तवली आहे.
भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आपल्या महाराष्ट्रात उत्तर भारताकडून थंड वारे येत आहेत अन् यासोबत दक्षिणेतून बाष्पयुक्त वारे सुद्धा येत आहे. दरम्यान याच थंड आणि बाष्पयुक्त वाऱ्यांमुळे वातावरणाच्या वरच्या थरांत झोतवारा वेगाने वाहत आहे.
हे वारे वातावरणाच्या खालच्या थरांतही दाखल होत आहेत. याचाच परिणाम म्हणून महाराष्ट्रात पावसासाठी पोषक परिस्थिती तयार होत आहे. राज्यात या वातावरणीय परिस्थितीमुळे बोचरी थंडी, दाट धुके अन् पावसाचे वातावरण तयार होत आहे.
राज्यात बुधवारपासून चार दिवस काही भागांत हलक्या सरींचा अंदाज आहे. महाराष्ट्रात उत्तर व दक्षिण भागातून येणार्या वार्यांची टक्कर होत असल्याने विचित्र वातावरण तयार झाले आहे. तापमानात वाढ होऊनही वरच्या थरातील वारे, दाट धुके अन् पाऊस असे वातावरण 25 ते 29 पर्यंत राहण्याची शक्यता आहे.
25 ते 29 डिसेंबर दरम्यान राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता आहे. या काळात सर्व दूर पाऊस होणार नाही मात्र उत्तरेकडील जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता आहे. उत्तरेकडील धुळे, नंदूरबार आणि नाशिक या जिल्ह्यांना पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
पण, ढगाळ वातावरणामुळे राज्यात इतर भागातही पाऊस वाढण्याचा अंदाज आहे. भारतीय हवामान खात्याने अवकाळी पावसाची शक्यता वर्तवली असल्याने राज्यातील कांदा, गहू, हरबरा पिकावर अळी, कीड, बुरशी, माव्याचा प्रभाव पाहायला मिळू शकतो.
त्यामुळे कीड व बुरशीनाशकाच्या फवारण्या घ्याव्या लागण्याचीही शक्यता आहे. फुलोर्यातील पिकांच्या परागीभवन व घाटे अवस्थेतील दाणाभरणीवर विपरित परिणाम होऊ शकतो. प्रकाशसंष्लेषणा अभावी अन्नद्रव्याच्या अपुर्या पुरवठ्यातून पिके कोमेजणे, वाढ खुटणे असे परिणाम होऊ शकतात.
घड तयार होत असणार्या द्राक्षांच्या बागांवरही दमट हवामानाचा विपरित परिणामही होऊ शकतो, अशी भीती कृषी क्षेत्रातील जाणकारांकडून व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांनी आपल्या शेती पिकांचे विशेष काळजी घ्यावी असे आवाहन यावेळी करण्यात आले आहे.