Havaman Andaj : महाराष्ट्राच्या हवामानात अचानक मोठा बदल झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून शांत असणारा पाऊस आता पुन्हा एकदा सक्रिय झाला आहे. काल गणेशोत्सवापासून महाराष्ट्रात पावसासाठी पोषक परिस्थिती तयार झाली आहे. काल राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला आहे.
महत्त्वाचे म्हणजे आज अन उद्या महाराष्ट्रात पावसाचा जोर कायम राहील असा अंदाज देण्यात आला आहे. किंबहुना आज पावसाचा जोर वाढणार आहे. या अनुषंगाने भारतीय हवामान खात्याने आज आणि उद्या राज्यातील काही जिल्ह्यांना ऑरेंज आणि काही जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी केला आहे.
गेले काही दिवस विश्रांती घेणारे मान्सूनचे वारे राज्यात आता पुन्हा एकदा सक्रिय झाले आहेत. पुन्हा एकदा राज्यातील हवामान बिघडले आहे. यामुळे आता राज्यात पुन्हा मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
एक आणि दोन सप्टेंबरला महाराष्ट्रात खूप मोठा पाऊस झाला होता. काही ठिकाणी अक्षरशः अतिवृष्टी झाली होती. यामुळे खरीप हंगामातील पिकांचे मोठे नुकसानही झाले. पण चार तारखेपासून पावसाने विश्रांती घेतली.
जवळपास सहा तारखेपर्यंत पाऊस विश्रांतीवर होता. मात्र गणपतीच्या आगमनालाच हवामान बिघडल आहे. राज्यात कालपासून पावसाला सुरवात झाली आहे. आय एम डी ने ९ सप्टेंबर पर्यंत राज्यात जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे.
कोणत्या जिल्ह्यांमध्ये बरसणार मुसळधार पाऊस?
8 सप्टेंबर : रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा या जिल्ह्यांमध्ये आज मुसळधार ते अति मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या अनुषंगाने पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणातील या पाच जिल्ह्यांना आयएमडीने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.
तसेच संपूर्ण विदर्भात आज पावसाचा गेलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. विदर्भातील नागपूर भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, अमरावती, वर्धा, बुलढाणा, अकोला, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे.
9 सप्टेंबर : पुणे, सातारा, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तसेच, विदर्भातील नागपूर भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, अमरावती, वर्धा, बुलढाणा, अकोला, वाशिम, यवतमाळ या 11 जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे.