Havaman Andaj : राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक अतिशय महत्वाची बातमी समोर येत आहे. ही बातमी राज्यातील शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी आहे. खरेतर IMD ने राज्यात पुन्हा एकदा अवकाळीची शक्यता वर्तवली आहे. सध्या राज्यातील काही भागात तापमान 38-40 अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचले आहे.
सर्वत्र वाढत्या तापमानामुळे अंगाची अक्षरशा लाहीलाही होत आहे. मात्र अशा या परिस्थितीतच पुन्हा एकदा राज्यात अवकाळी पावसासाठी पोषक परिस्थिती तयार होत असल्याचा अंदाज आयएमडीच्या माध्यमातून समोर आला आहे.
जसं की आपणास ठाऊकच आहे की या चालू मार्च महिन्याची सुरुवात अवकाळी पावसाने झाली होती. अवकाळी पावसामुळे रब्बी हंगामातील पिकांचे मोठे नुकसान झाले होते.
शेतकऱ्यांनी अगदी तळ हाताच्या फोडाप्रमाणे जोपासलेले शेती पिक अवकाळी पावसामुळे आणि गारपिटीमुळे झोडपले गेले. आता पुन्हा एकदा तशीच परिस्थिती तयार होणार असा अंदाज समोर येत आहे.
भारतीय हवामान खात्याने राज्यातील विदर्भ विभागातील सहा जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाची शक्यता दिली आहे तर काही ठिकाणी गारपीट होणार असाही अंदाज समोर आला आहे.
यामुळे शेतकऱ्यांची काळजाची मात्र धडधड वाढली आहे. शेतकऱ्यांची रब्बी हंगामातील पिके आता काढणीच्या अवस्थेत आहेत. अशातच आता राज्यात पुन्हा एकदा पावसाचा अंदाज देण्यात आला असल्याने शेतकरी बांधव काहीसे चिंतेत पाहायला मिळत आहेत.
कुठे बरसणार अवकाळी पाऊस
हवामान विभागाने आपल्या नवीन बुलेटिन मध्ये 16 मार्च 2024 रोजी राज्यातील विदर्भ विभागातील भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदीया, नागपूर, वर्धा या 6 जिल्ह्यांमध्ये विजा आणि ढगांच्या गडगडाटासह काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता वर्तवली आहे.
या पार्श्वभूमीवर आयएमडीने सदर जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट सुद्धा यावेळी जारी केला आहे. तसेच रविवारी अर्थातच 17 मार्च रोजी राज्यातील अमरावती, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदीया, नागपूर, वर्धा आणि यवतमाळ या 8 जिल्ह्यात विजा आणि ढगांच्या गडगडाटासह काही ठिकाणी हलक्या पावसाचा येलो अलर्ट दिला आहे.
एवढेच नाही तर नागपूर, चंद्रपूर, गोंदिया या जिल्ह्यात 17 तारखेला गारपीट होण्याची शक्यताही आयएमडीने वर्तवली आहे. शिवाय, 18 तारखेला भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदीया, नागपूर, वर्धा या जिल्ह्यांमध्ये विजा आणि ढगांच्या गडगडाटासह काही ठिकाणी हलका पाऊस हजेरी लावणार असा अंदाज आहे.
या पार्श्वभूमीवर 18 तारखेला या संबंधित जिल्ह्यांसाठी येल्लो अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे विदर्भातील या सात-आठ जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांना विशेष काळजी घ्यावी लागणार आहे.