Havaman Andaj : सबंध महाराष्ट्रासाठी एक अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर येत आहे. ती म्हणजे महाराष्ट्रात आगामी काही तासात पावसाचा जोर वाढणार आहे. खरंतर गेल्या काही दिवसांपासून राज्यात पुन्हा एकदा पावसाला सुरुवात झाली आहे.
ऑगस्ट महिना संपूर्ण कोरडा गेल्यानंतर सप्टेंबर महिन्याची सुरुवात पावसाने झाली. गेली चार ते पाच दिवस राज्यातील बहुतांश भागात पावसाने हजेरी लावली आहे. मात्र असे असले तरी पुणे व आजुबाजूचा परिसर वगळता राज्यात अजूनही मुसळधार पाऊस पाहायला मिळत नाहीये.
यामुळे सर्वत्र चिंतेचे वातावरण आहे. अशातच बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. यामुळे राज्यात येत्या दोन ते तीन दिवसात मुसळधार पाऊस पडणार असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. येत्या दोन ते तीन दिवसात पावसाच्या प्रमाणात सुधारणा होणार अस सांगितलं जात आहे.
पुणे हवामान खात्याचे प्रमुख डॉक्टर के एस होसाळीकर यांनी सहा व सात सप्टेंबर रोजी राज्यातील बहुतांशी भागात पावसाचा जोर वाढणार असे मत व्यक्त केले आहे. मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात समाधानकारक पाऊस पडेल असे त्यांनी सांगितले आहे.
दरम्यान भारतीय हवामान विभागाने शनिवार पर्यंत म्हणजेच 9 सप्टेंबर पर्यंत राज्यातील पावसाचा जोर कायम राहणार असल्याची शक्यता व्यक्त केली आहे. कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भामध्ये 9 सप्टेंबर पर्यंत पावसाचा जोर कायम राहणार आहे.
या पार्श्वभूमीवर हवामान विभागाच्या माध्यमातून या संबंधित विभागासाठी येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच सात सप्टेंबरला अर्थातच उद्या राज्यातील विदर्भात अति मुसळधार पावसाची शक्यता असून या पार्श्वभूमीवर विदर्भ विभागासाठी उद्या ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
भारतीय हवामान विभागाने महाराष्ट्रातील जवळपास 21 जिल्ह्यांना जोरदार पावसाचा इशारा दिला आहे. यामुळे या संबंधित 21 जिल्ह्यातील सर्वसामान्य जनतेसहित शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
आय एम डी ने दिलेल्या माहितीनुसार, कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मध्य महाराष्ट्रातील सातारा, सोलापूर, मराठवाड्यातील धाराशिव, लातूर, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड आणि विदर्भामधील बुलढाणा, अकोला, वाशिम, यवतमाळ, अमरावती, वर्धा, नागपूर, गोंदिया, भंडारा या जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. याव्यतिरिक्त विदर्भातील चंद्रपूर आणि गडचिरोलीमध्ये अति मुसळधार पावसाची शक्यता पाहता पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.