Havaman Andaj : राज्यात गणरायाच्या आगमनापासून अर्थातच गणेश चतुर्थी पासून जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. गणरायाच्या आगमनाबरोबर दाखल झालेला पाऊस गणरायाच्या विसर्जन मिरवणुकीत देखील मनसोक्त बरसला आहे. 19 सप्टेंबर ते 28 सप्टेंबर दरम्यान राज्यातील विविध भागात मध्यम ते जोरदार पाऊस झाला.
दुष्काळाच्या उंबरठ्यावर उभा असलेल्या महाराष्ट्राला यामुळे किंचित दिलासा देखील मिळाला. काही भागात मात्र पिके वाया गेल्यानंतर पाऊस आला असल्याने तेथील खरीप हंगामातील पिकांना या पावसाचा फारसा फायदा झाला नाही. मात्र येत्या रब्बी हंगामात या जोरदार पावसाचा फायदा होईल असे मत तज्ञांनी व्यक्त केले आहे.
खरंतर गणेशोत्सवामध्ये जोरदार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला होता. यानुसार राज्यात जोरदार पाऊसही झाला. पण काल गणेशोत्सवाच्या सणाची सांगता झाली आहे. सोबतच राजस्थानमधून परतीच्या पावसाला देखील सुरुवात झाली आहे. यामुळे आता पाऊस उघडीप देणार का ? असा प्रश्न शेतकऱ्यांकडून तसेच सर्वसामान्य जनतेकडून उपस्थित केला जात आहे.
अशातच भारतीय हवामान खात्याने पावसाबाबत महत्त्वाची अपडेट दिली आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात आगामी काही दिवस पावसाचा मुक्काम राहणार आहे. अर्थातच बाप्पाला निरोप देऊनही राज्यात वरूणराजा काही काळ मनसोक्त बरसणार आहे. आय एम डी नुसार येत्या 24 तासात राज्यातील काही जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे.
कोल्हापूर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये आगामी काही तासात जोरदार पावसाचा अंदाज आहे. राजधानी मुंबईत मात्र पाऊस विश्रांती घेईल. परंतु मुंबईच्या उपनगरात तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. मुंबई आणि पुणे विभागाला येल्लो अलर्ट देण्यात आला आहे.
विदर्भातील काही भागातही पावसाचा अंदाज असून तिथे देखील येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. दरम्यान महाराष्ट्रातून 10 ते 12 ऑक्टोबरच्या सुमारास मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू होणार असल्याचे सांगितले जात आहे. तसेच ऑक्टोबरच्या सुरुवातीला राज्यातून पावसाचा जोर कमी होणार आहे.
दरम्यान आगामी काही तासात राज्यातील ठाणे आणि पालघर पट्ट्यामध्ये आकाश अंशत: ढगाळ राहणार असा अंदाज आहे. तसेच मध्य महाराष्ट्रातील सातारा, पुणे, कोल्हापूर या जिल्ह्यातील घाटमाथ्यावर ढगाळ वातावरणासह अधूनमधून पावसाच्या तुरळक सरी बरसणार असल्याचे IMD ने आपल्या निवेदनात स्पष्ट केले आहे.
एकंदरीत राज्यातील काही भागात आगामी काही तास पाऊस पडण्याची शक्यता आहे. पण ऑक्टोबरमध्ये अगदी सुरुवातीलाच राज्यातील पावसाचा जोर कमी होणार असे सांगितले जात आहे.