Havaman Andaj : गेल्या महिन्याची एंडिंग धुवाधार अवकाळी पावसाने आणि गारपिटीने झाली आहे. त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांच्या रब्बी हंगामातील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. अगदी तळहाताच्या फोडाप्रमाणे जोपासलेले गहू, हरभरा, कांदा इत्यादी पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
यामुळे शेतकऱ्यांना हजारो रुपयांचा फटका बसणार आहे. परिणामी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या माध्यमातून लवकरात लवकर नुकसान भरपाई देण्याबाबत कारवाई सुरू झाली पाहिजे अशी मागणी करण्यात आली आहे.
अशातच, आता नवीन महिन्याची सुरुवात देखील अवकाळी पावसानेच होणार असा अंदाज समोर आला आहे. भारतीय हवामान खात्याने आपल्या नवीन हवामान अंदाजात राज्यातील काही जिल्ह्यांसाठी गारपिटीचा इशारा दिला आहे.
कोणत्या जिल्ह्यात होणार गारपीट
भारतीय हवामान खात्याने वर्तवलेला हा नवीन हवामान अंदाज शेतकऱ्यांची चिंता वाढवणारा आहे. कारण की हवामान खात्याने पुन्हा एकदा महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात गारपीट होणार असा अंदाज दिला आहे.
खरे तर खानदेश आणि विदर्भातील काही जिल्ह्यात नुकत्याच काही दिवसांपूर्वी जोरदार स्वरूपाची गारपीट झाली आहे. त्यामुळे तेथील शेतीपिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
दरम्यान, आता पुन्हा एकदा राज्यातील खानदेश आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यात गारपीटीची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
हवामान खात्याने मराठवाडा विभागातील छत्रपती संभाजीनगर आणि खानदेश विभागातील जळगाव अन धुळे या जिल्ह्यातील काही भागात गारपीट होऊ शकते असे म्हटले आहे.
एवढेच नाही तर उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि पश्चिम विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाचा इशारा यावेळी आयएमडीच्या माध्यमातून जारी करण्यात आला आहे.
IMD ने धुळे, जळगाव, संभाजीनगर या जिल्ह्यातही वादळी पावसासह गारपिटीचा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर या संबंधित जिल्ह्यांना येलों अलर्ट जारी झाला आहे.
तसेच नंदूरबार, नाशिक, जालना, बुलडाणा, अकोला, अमरावती, वाशीम, यवतमाळ या जिल्ह्यात वादळी पावसाचा इशारा आयएमडीकडून देण्यात आला आहे.