Havaman Andaj September 2023 : महाराष्ट्रात काल अर्थातच गुरुवारी बहुतांशी भागात पाऊस झाला आहे. नाशिक जिल्ह्यातही काल पावसाने हजेरी लावली आहे. वास्तविक जून ते सप्टेंबर या चार महिन्यांच्या मान्सून काळापैकी तीन महिन्याचा मान्सून काळ उलटला आहे. मान्सूनचा शेवटचा महिना अर्थातच सप्टेंबर महिन्याचा पहिला आठवडा देखील संपला आहे.
या सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात मात्र राज्यातील काही भागात चांगला पाऊस झाला आहे. तर काही भागात हळूहळू पावसाचा जोर वाढत आहे. यामुळे ऑगस्ट महिन्यात पडलेल्या पावसाच्या खंडामुळे संकटात आलेल्या शेती पिकांना पुन्हा एकदा नवीन जीवदान मिळत आहे. मात्र असे असले तरी शेती पिकांना चांगल्या मोठ्या पावसाच्या आवश्यकता आहे.
दरम्यान भारतीय हवामान विभागाने आज आणि उद्या राज्यातील बहुतांशी भागात चांगला मोठा पाऊस पडणार असा अंदाज व्यक्त केला आहे. हवामान तज्ञ माणिकराव खुळे यांनी आज आठ सप्टेंबर आणि उद्या 9 सप्टेंबर रोजी महाराष्ट्रात सर्व दूर मुसळधार पाऊस पडणार असा अंदाज व्यक्त केला आहे.
भारतीय हवामान विभागाने आज अर्थातच 8 सप्टेंबर 2023 रोजी राज्यातील काही जिल्ह्यात चांगल्या पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. आज राज्यातील काही जिल्ह्यांना हवामान खात्याच्या माध्यमातून येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. आय एम डी ने दिलेल्या माहितीनुसार, बंगालच्या उपसागरात निर्माण झालेला कमी दाबाचा पट्टा राज्यात पावसासाठी पोषक परिस्थिती तयार करत आहे.
यामुळे आज महाराष्ट्रात बहुतांशी ठिकाणी पावसाचा जोर वधारणार आहे. आज राज्यातील कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यात पावसाची शक्यता असून या पार्श्वभूमीवर या संबंधीत जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे.
आज मराठवाड्यातील बीड, जालना, छत्रपती संभाजी नगर या जिल्ह्यासाठी येल्लो अलर्ट देण्यात आला आहे. तसेच विदर्भातील अमरावती, चंद्रपूर, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट देण्यात आला आहे.
याव्यतिरिक्त कोकणातील पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मध्य महाराष्ट्रातील नंदुरबार, जळगाव, नाशिक, अहमदनगर, पुणे, सातारा या जिल्ह्यांसाठी येल्लो अलर्ट देण्यात आला आहे. उर्वरित महाराष्ट्रात मात्र आज हलका ते मध्यम पाऊस पडणार असा अंदाज आहे.