Havaman Andaj : मान्सूनोत्तर पावसाने महाराष्ट्राला अक्षरशा झोडपून काढले. मान्सून निघून गेल्यानंतर राज्यात जो पाऊस झाला त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. मात्र, आता गेल्या काही दिवसांपासून पावसाची विश्रांती आहे आणि यामुळे राज्यात शेतीकामांनी गती पकडली आहे.
दीपोत्सवाचा काळ असतानाही राज्यात मोठ्या उत्साहात शेतीच्या कामांना गती दिली जात आहे. मजूर मिळत नसल्याने शेतकरी बांधव आपल्या परिवारासहितच शेत शिवारात रमतायेत. अशातच मात्र शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे.
हवामान खात्याने पुन्हा एकदा राज्यात पावसाची शक्यता वर्तवली आहे. भारतीय हवामान खात्याने उद्यापासून महाराष्ट्रातील काही भागात हलक्या पावसाचा अंदाज दिला आहे.
यामुळे शेती कामांना फटका बसण्याची शक्यता आहे. परिणामी शेतकऱ्यांनी पावसाचा अंदाज लक्षात घेऊनच आपल्या शेतीकामांची नियोजन आखावे असे सांगितले गेले आहे.
या भागात पावसाची शक्यता
भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार उद्या अर्थातच 29 ऑक्टोबरला राज्यातील विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा आणि गोंदीया जिल्ह्यात काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे.
तसेच कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात सुद्धा काही ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे. पावसाची तीव्रता फारशी राहणार नाही मात्र पावसाचा अंदाज लक्षात घेऊनच शेतकऱ्यांनी आपल्या शेतीकामांचे नियोजन आखावे असा सल्ला यावेळी जाणकारांनी दिला आहे. 30 तारखेला मात्र पावसाची व्याप्ती आणखी वाढणार आहे.
या दिवशी दक्षिण कोकणातील तिन्ही जिल्ह्यांमध्ये, मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर, सातारा, पुणे, अहिल्यानगर, मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड आणि विदर्भातील यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, गोंदीया आणि गडचिरोली जिल्ह्यात काही भागात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार असा अंदाज आहे.
31 ऑक्टोबरला आणि एक नोव्हेंबरला देखील कोकण मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात पावसाची शक्यता आहे. या अनुषंगाने भारतीय हवामान खात्याकडून संबंधित जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे.