Havaman Andaj : जुलै महिन्याच्या शेवटी विश्रांतीवर गेलेला पाऊस आता पुन्हा एकदा परतला आहे. विशेष म्हणजे पावसाने जबरदस्त कम बॅक केला असून गेल्या चार-पाच दिवसांमध्ये राज्यातील अनेक जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला आहे. राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये सलग दोन दिवस पाऊस झाला असल्याने काही ठिकाणी पूरसदृश्य परिस्थिती तयार होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
गेल्या महिन्यात अर्थातच जुलैमध्ये जोरदार पावसामुळे अनेक ठिकाणी पूरस्थिती तयार झाली. कोल्हापूर, पुणे, मुंबईमध्ये तर सर्वसामान्य जनजीवन फारच विस्कळीत झाले होते. शेतकऱ्यांच्या शेती पिकांना देखील या पूरस्थितीचा फटका बसला.
मात्र जुलै च्या शेवटच्या आठवड्यात पावसाने उसंत घेतली. पण, आता जुलै महिन्यासारखाच हाहाकार पाहायला मिळत आहे. ऑगस्ट महिन्याची सुरुवात जोरदार पावसाने झाली आहे. गेल्या दोन दिवसांपासून महाराष्ट्राला मुसळधार पावसाने अक्षरशा झोडपून काढले आहे.
राज्याच्या मध्य महाराष्ट्रातील नाशिक आणि पुण्यामध्ये पावसाचा जोर सर्वाधिक पाहायला मिळाला आहे. पुणे जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर पावसाची तीव्रता अधिक पाहायला मिळाली आहे. पुणे अन नाशिकमध्ये अक्षरशः पुरस्थिती पाहायला मिळत आहे.
मात्र काल अर्थात सोमवारी नाशिक आणि पुण्यासहित राज्यातील अनेक भागांमध्ये पावसाने विश्रांती घेतली. तथापि भारतीय हवामान खात्याने आज पुन्हा एकदा राज्यात जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे. भारतीय हवामान खात्याने आज महाराष्ट्रातील 15 जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे.
अर्थातच जवळपास निम्म्या महाराष्ट्रात आज पावसाची शक्यता आहे. हवामान खात्याने 15 जिल्ह्यांना अलर्ट जारी केला असून उर्वरित राज्यात हलका ते मध्यम पाऊस होणार अशी शक्यता आहे.
कोणत्या जिल्ह्यात बरसणार मुसळधार पाऊस
भारतीय हवामान खात्याने आज सहा ऑगस्टला राज्यातील विदर्भ, कोकण आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे. आज दक्षिण कोकणातील रायगड, रत्नागिरी, मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा तसेच सांगली जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता आहे.
जोरदार पावसाची शक्यता लक्षात घेता या संबंधित जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. तसेच आज विदर्भ विभागातील पूर्व आणि पश्चिमेकडील सर्वच जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे.
विदर्भातील जिल्ह्यांमध्ये आज विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. विदर्भातील सर्वच्या सर्व 11 जिल्ह्यांमध्ये आज पावसाची शक्यता असून या जिल्ह्यांनाही आज येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.