Havaman Andaj March : राज्यातील हवामानातं गेल्या काही दिवसांपासून सातत्याने बदल पाहायला मिळत आहे. या चालू मार्च महिन्याच्या सुरुवातीला राज्यातील विदर्भ, मराठवाडा आणि खानदेश मधील अनेक भागांमध्ये अवकाळी पाऊस आणि गारपीट झाली.
अवकाळी पावसामुळे आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे मोठे नुकसान झाले. मात्र, आता गेल्या काही दिवसांपासून राज्यातील हवामान प्रामुख्याने कोरडे पाहायला मिळत आहे.
महाराष्ट्रातील काही भागांमध्ये दिवसाचे कमाल तापमान हे ३८ ते ४० अंश सेल्सिअस दरम्यान नमूद केले जात आहे. यामुळे राज्यातील अनेक भागात नागरिक घामाघुम होत असल्याचे चित्र आहे. अशातच, मात्र पुन्हा एकदा राज्यात अवकाळी पावसाची शक्यता वर्तवली जात आहे.
राज्यात येत्या दोन दिवसांनी अर्थातच 16 मार्चपासून पुन्हा एकदा अवकाळी पावसाला सुरुवात होणार अशा बातम्या व्हायरल होत आहेत. अशा परिस्थितीत, खरंच येत्या दोन दिवसांनी महाराष्ट्रात अवकाळी पावसाला सुरुवात होणार का ? याबाबत आज आपण हवामान खात्याचे निवृत्त हवामान शास्त्रज्ञ माणिकराव खूळे यांच्याकडून सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
कस राहणार राज्यातील हवामान
या चालू महिन्याच्या सुरुवातीला राज्यातील काही भागात तुफान पाऊस अन गारपीट झाली. अवकाळी पावसामुळे आणि गारपिटीमुळे रब्बी हंगामातील पिकांना मोठा फटका बसला.
अशातच आता पुन्हा एकदा राज्यात 16 मार्चपासून पावसाची शक्यता वर्तवली जात आहे. हवामान खात्याचे निवृत्त हवामान शास्त्रज्ञ माणिकराव खुळे यांनी सांगितल्याप्रमाणे राज्यातील काही भागांमध्ये 16 मार्च ते 19 मार्च 2024 दरम्यान ढगाळ हवामानाची शक्यता राहणार आहे.
या कालावधीत राज्यातील विदर्भ विभागातील काही मोजक्याच जिल्ह्यात ढगाळ हवामान राहील आणि यापैकी काही ठराविक जिल्ह्यात अगदी तुरळक ठिकाणी किरकोळ स्वरूपाच्या पावसाची शक्यता असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले आहे.
अमरावती, नागपूर, गोंदिया आणि गडचिरोली अश्या ४ जिल्ह्यांमध्ये १६ ते १९ मार्च दरम्यान ढगाळ हवामानाची शक्यता आहे. तसेच याच जिल्ह्यांमध्ये काही भागात अगदी तुरळक ठिकाणी किरकोळ स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
दुसरीकडे राज्यातील उर्वरित जिल्ह्यांमध्ये हवामान प्रामुख्याने कोरडे राहणार आहे. या कालावधीत राज्यातील उर्वरित भागात कुठेच अवकाळी पाऊस किंवा गारपीट होणार नाही यामुळे शेतकऱ्यांनी फारशी काळजी करू नये, असे खुळे यांनी यावेळी स्पष्ट केले आहे.