Havaman Andaj Marathi : राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक अतिशय महत्वाची आणि मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. ही आनंदाची बातमी आहे पावसा संदर्भात. गेल्या तीन ते चार दिवसांपासून पुन्हा एकदा राज्यातील शेतकऱ्यांच्या नजरा आभाळाकडे लागल्या आहेत.
वास्तविक, या चालू महिन्याच्या सुरुवातीला राज्यातील काही भागात पाऊस झाला होता. सात ते दहा सप्टेंबर दरम्यान राज्यातील बहुतांशी भागात चांगल्या पावसाची नोंद करण्यात आली. यामुळे आता गेल्या ऑगस्ट महिन्यातील पावसाची तूट भरून निघेल अशी आशा व्यक्त केली जात होती.
अनेक हवामान तज्ञांनी या चालू महिन्यात जोरदार पाऊस पडणार असा अंदाज व्यक्त केला होता. पण आता गेल्या तीन ते चार दिवसांपासून राज्यातून पाऊस जणू काही गायबच झाला आहे. यामुळे पुन्हा एकदा राज्यातील शेतकरी बांधव चिंतेत आले आहेत.
अशातच पुणे वेधशाळेच्या माध्यमातून एक अतिशय महत्त्वाचा हवामान अंदाज वर्तवण्यात आला आहे. पुणे वेधशाळेतील शास्त्रज्ञ शिल्पा आपटे यांनी दिलेल्या माहितीनुसार, बंगालच्या उपसागरात तयार झालेले कमी दाबाचे क्षेत्र येत्या 24 तासात आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे.
याचा परिणाम म्हणून आता महाराष्ट्रात पुन्हा एकदा पावसाला सुरुवात होऊ शकते. आज अर्थातच 14 सप्टेंबरच्या संध्याकाळपासून मान्सून पुन्हा एकदा सक्रिय होणार असे त्यांनी सांगितले आहे. यामुळे पुणे आणि घाटमाथ्यावर जोरदार पाऊस पडणार अशी शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे.
याव्यतिरिक्त महाराष्ट्रात 15, 16 आणि 17 सप्टेंबर रोजी बहुतांशी भागात पाऊस पडू शकतो असा अंदाजही त्यांनी व्यक्त केला आहे. येत्या 48 तासात कोकणातही पावसाची शक्यता आहे. कोकणातील दक्षिण भागातील रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या तीन जिल्ह्यात बहुतांशी भागात येत्या 48 तासात मुसळधार पाऊस पडू शकतो असे त्यांनी सांगितले आहे.
तसेच येत्या ४८ तासात मराठवाड्यातील परभणी, हिंगोली आणि विदर्भातील गांदिया, भंडारा, गडचिरोली जिल्ह्यांतील बहुतांश ठिकाणी मेघगर्जनेसह आणि विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
मध्य महाराष्ट्रातही मुसळधार पावसाची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रातील तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस तर घाट विभागातील काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडू शकतो असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
एकंदरीत आज बैलपोळ्याच्या सणाला महाराष्ट्रात पुन्हा एकदा पाऊस सक्रिय होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यामुळे आता पुणे वेधशाळेतील हवामान तज्ञांनी सांगितल्याप्रमाणे राज्यात खरच पाऊस पडतो का हे विशेष पाहण्यासारखे राहणार आहे.