Havaman Andaj Maharashtra : महाराष्ट्राकडे पाठ फिरवलेल्या पावसाने पुन्हा एकदा हजेरी लावली आहे. जून महिन्यात राज्यातील बहुतांशी भागांमध्ये सरासरी पेक्षा कमी पाऊस झाला. जुलैच्या पहिल्या आठवड्यातही राज्यात कुठेचं जोरदार पाऊस झाला नव्हता. यामुळे शेतकऱ्यांसहित सर्वचजण चिंतेत होते. जोरदार पावसाची साऱ्यांनाच प्रतीक्षा होती.
भारतीय हवामान खात्याने मात्र जुलैच्या अगदी सुरुवातीलाच जुलै महिन्यात राज्यात सरासरी पेक्षा जास्तीचा पाऊस पडणार असा अंदाज दिला होता. जुलैमध्ये राज्यातील 30 जिल्ह्यांमध्ये 106% पावसाची शक्यता आहे तर उर्वरित सहा जिल्ह्यांमध्ये 94 ते 104% दरम्यान पाऊस पडणार असा अंदाज आहे.
दरम्यान, हवामान खात्याच्या अंदाजानुसार आता जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. गेल्या तीन दिवसांपासून राज्यातील बहुतांशी जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची नोंद करण्यात आली आहे. काल देखील राज्यात नाशिकसहित अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस झाला आहे.
मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यांमध्ये गेल्या दोन-तीन दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू आहे. मराठवाड्यात तर काही ठिकाणी अतिवृष्टी झाल्याची नोंद करण्यात आली आहे. विदर्भातही निम्म्याहून अधिक जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस झाला आहे.
मुंबईसह संपूर्ण कोकणात पावसाचे रुद्र रूप पाहायला मिळाले आहे. पुणे, सातारा, कोल्हापूर, नाशिक जिल्ह्यात ठीक-ठिकाणी जोरदार पाऊस झाला आहे. अहमदनगर जिल्ह्यात सर्वदूर पाऊस झाला असून काही ठिकाणी अतिवृष्टी पाहायला मिळाली आहे.
दरम्यान आजपासून पुढील चार दिवस राज्यात जोरदार पाऊस होणार असा अंदाज आहे. कालच्या तुलनेत आज पावसाचा जोर कमी राहणार आहे. पण, कोकण, विदर्भ, मध्य महाराष्ट्रातील पुणे अन सातारा या जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पाऊस पडणार असा अंदाज आहे.
मराठवाड्याबाबत बोलायचं झालं तर छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली आणि नांदेड या जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पाऊस हजेरी लावणार अशी शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर संबंधित जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे.
तसेच उर्वरित जिल्ह्यांमध्ये ठिकठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस हजेरी लावणार असे म्हटले गेले आहे. उद्या कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावर जोरदार पावसाची शक्यता आहे. शुक्रवारी या भागात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढणार आहे.
शनिवारी कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात जोरदार पावसाची शक्यता भारतीय हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. एकंदरीत केल्या अनेक दिवसांपासून ज्या जोरदार पावसाची प्रतीक्षा होती त्याचे आता कमबॅक झाले आहे.