Havaman Andaj Maharashtra : ऑगस्ट महिन्यात महाराष्ट्रावर रुसलेला पाऊस सध्या महाराष्ट्राला झोडपत आहे. गेल्या दोन ते तीन दिवसांपासून राज्यातील वेगवेगळ्या भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची हजेरी लागत आहे. जून आणि ऑगस्ट या दोन महिन्यात राज्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला होता.
यामुळे खरिपातील पिके अक्षरशा व्हेंटिलेटर वर पोहोचली होती. पावसाचा खंड आणि उन्हात झालेली प्रचंड वाढ यामुळे खरिपातील पिके होरपळत होती. शेतकऱ्यांनी तळ हाताच्या फोडाप्रमाणे जोपासलेले पीक त्यांच्या डोळ्यादेखत जळत होते. पण या चालू सप्टेंबर महिन्याची सुरुवात पावसाने झाली आहे.
सात सप्टेंबर पासून राज्यात सर्व दूर पावसाचा जोर वाढला आहे. त्यामुळे खरिपातील पिकांना जीवदान मिळाले आहे. सध्या सुरू असलेल्या या पावसामुळे खरिपातील पिके पुन्हा एकदा डोलू लागली आहेत. परिणामी बळीराजाच्या चेहऱ्यावर कधी नव्हे ते समाधानाचे भाव पाहायला मिळत आहेत. सर्वत्र आनंदाचे आणि उल्हासाचे वातावरण आहे.
सध्या कोसळत असलेल्या या पावसामुळे काही ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे तर काही सकल भागात पावसाचे पाणी साचले आहे. यामुळे नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे परंतु ही अडचण दुष्काळापेक्षा चांगली असल्याचे मत नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
काही ठिकाणी जास्तीच्या पावसामुळे शेती पिके खराब होण्याची देखील भीती आहे परंतु या पावसाचा भविष्यात फायदा होणार असे मत सध्या व्यक्त होत आहे. अशातच भारतीय हवामान विभागाने पावसाबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे.
खरंतर राज्यात गेल्या दोन ते तीन दिवसांपासून सर्वदूर पावसाची हजेरी लागली आहे. पण काही भागात म्हणावा तसा पाऊस अजूनही पडलेला नाही. त्यामुळे तेथील शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. दरम्यान आज राज्यातील कोकण आणि मध्य महाराष्ट्रात पावसाचा अंदाज आहे.
मध्य महाराष्ट्रात प्रामुख्याने घाटमाथ्यावर पाऊस पडणार असे आयएमडीने स्पष्ट केले आहे. या पार्श्वभूमीवर कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील सहा जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट जारी करण्यात आला आहे. उत्तर कोकणातील ठाणे, दक्षिण कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग, मध्य महाराष्ट्रातील पुणे आणि सातारा या सहा जिल्ह्यांना आज पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.
यापैकी पुणे आणि सातारा जिल्ह्यातील घाटमाथ्यावर पावसाचा जोर अधिक राहणार असे मत व्यक्त करण्यात आले आहे. या सहा जिल्ह्यातील काही भागात मुसळधार पाऊस पडणार असा अंदाज आहे. दरम्यान पुणे वेधशाळेचे प्रमुख के. एस. होसाळीकर यांनी पुढील दोन ते तीन आठवडे राज्यात पाऊस पडत राहणार असा अंदाज व्यक्त केला आहे.
राज्यात गेल्या दोन ते तीन दिवसांपासून सक्रिय झालेला पाऊस आता पुढील दोन ते तीन आठवडे कायम राहणार असे मत त्यांनी व्यक्त केले आहे. यामुळे या खरीप हंगामातील पिकांना याचा फायदा होईल तसेच रब्बी हंगामातील पिकांसाठी देखील या पावसाचा परिपूर्ण फायदा होऊ शकतो असे बोलले जात आहे.