Havaman Andaj : देशातील हवामानात गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने बदल पाहायला मिळत आहे. राज्यातील हवामानातही आता मोठा बदल होत आहे. राज्यातील तापमान आता हळूहळू वाढू लागले आहे.
याचा परिणाम म्हणून महाराष्ट्रातील गारठा कमी झाला आहे. हवामान तज्ञांनी म्हटल्याप्रमाणे, उत्तर भारतात थंडीचा जोर कमी झाला आहे, यामुळे आपल्या महाराष्ट्रातही हळूहळू थंडी कमी होत आहे.
अशातच मात्र महाराष्ट्रातील हवामानात एक मोठा बदल पाहायला मिळणार, कारण की राज्यात अवकाळी पावसासाठी पोषक परिस्थिती तयार होत आहे.
महाराष्ट्रात पुन्हा एकदा अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. भारतीय हवामान विभागाने राज्यातील हवामाना संदर्भात महत्त्वाची अपडेट दिली आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पूर्व विदर्भापासून तेलंगणा, कर्नाटकपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा कायम आहे. याचा परिणाम म्हणून महाराष्ट्रात अवकाळी पावसाला पोषक हवामान तयार होत आहे.
खरेतर सध्या स्थितीला रब्बी हंगामातील पिके वाढीच्या अवस्थेत आहेत. अशातच आता राज्यात ढगाळ हवामानाची आणि अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असल्याने रब्बी हंगामातील पिकांवर विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे.
यामुळे उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट येऊ शकते असे मत कृषी तज्ञांनी व्यक्त केले आहे. हवामान खात्याने म्हटल्याप्रमाणे, महाराष्ट्रातील मराठवाडा आणि विदर्भ विभागात आज पासून पावसाला सुरुवात होण्याची शक्यता आहे.
दुसरीकडे IMD ने आज अरुणाचल प्रदेश राज्यातील काही भागात मध्यम पाऊस किंवा हिमवृष्टी होईल असे म्हटले आहे. तसेच आज 8 फेब्रुवारी 2024 रोजी उप-हिमालयीन पश्चिम बंगाल, सिक्कीम, आसाम, मेघालय, नागालँड, मिझोराम, मणिपूर, त्रिपुरा येथे पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
हवामान खात्याने 9-11 फेब्रुवारी दरम्यान उत्तर भारतात पावसाची शक्यता वर्तवली आहे. एकंदरीत उत्तर भारतात, ईशान्येकडील राज्यांमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
याशिवाय आपल्या महाराष्ट्रात देखील अवकाळी पाऊस बरसणार आहे.यामुळे या संबंधित भागातील शेतकऱ्यांनी आपल्या शेती पिकांची काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.