Havaman Andaj : महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली आहे. मात्र आता पुन्हा एकदा पाऊस ऍक्टिव्ह होणार आहे. भारतीय हवामान खात्याने आज आणि उद्या राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता वर्तवली आहे. खरंतर, सप्टेंबरच्या सुरुवातीला महाराष्ट्रात जोरदार पावसाने हजेरी लावली होती.
एक ते तीन सप्टेंबर आणि 7 ते 10 सप्टेंबर दरम्यान महाराष्ट्रातील बहुतांशी जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस झाला होता. सात सप्टेंबरला अर्थातच गणरायाच्या आगमनाच्या दिवशी राज्यात पाऊस सक्रिय झाला होता मात्र पावसाचा जोर फारच कमी होता.
नंतर अनंत चतुर्दशीच्या दिवशीही महाराष्ट्रात काही ठिकाणी पावसाची हजेरी लागली. दरम्यान, काल अर्थातच 19 सप्टेंबरला राज्यातील उत्तर महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील काही भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची हजेरी पाहायला मिळाली.
काही ठिकाणी पावसाचा जोर थोडासा अधिक होता तर काही ठिकाणी फक्त ढगाळ हवामान होते. अशातच, आता भारतीय हवामान खात्याने आज आणि उद्या राज्यातील कोकण व विदर्भ विभागातील काही ठिकाणी आणि मध्य महाराष्ट्र तसेच मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे.
पुणे वेधशाळेने दिलेल्या माहितीनुसार, सध्या कमी दाबाचा पट्टा झारखंड व त्याला जोडून उत्तर छत्तीसगडच्या भागात सक्रीय असल्याचे दिसत आहे. एवढेच नाही तर या भागात सक्रिय असलेल्या तीव्र कमी दाबाच्या पट्ट्याचे रूपांतर आता ठळक कमी दाबाच्या क्षेत्रात झाले आहे.
हे तीव्र कमी दाबाचे क्षेत्र उत्तर मध्य प्रदेश व लगतच्या भागावर तयार झालेले आहे. यामुळे आज आणि उद्या म्हणजेच वीस आणि 21 सप्टेंबरला राज्यात पावसासाठी पोषक परिस्थिती तयार होत आहे. हे दोन दिवस मध्य महाराष्ट्रात हलका ते मध्यम पाऊस पडणार असा अंदाज आहे.
आज आणि उद्या उत्तर महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे. तसेच उद्या अहमदनगर आणि सोलापूर येथे वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर या तिन्ही जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
आज आणि उद्या मराठवाड्यातील बहुतांशी जिल्ह्यांमध्ये तसेच 21 आणि 22 सप्टेंबरला विदर्भातील सर्वच्या सर्व 11 जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
या पार्श्वभूमीवर विदर्भ आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांनाही येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. आज जळगाव, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. उद्या संपूर्ण विदर्भ, मराठवाड्याला यलो अलर्ट देण्यात आला आहे.
मध्य महाराष्ट्रातील अहमदनगर, सोलापूर जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. तसेच 22 सप्टेंबरला विदर्भातील सर्वच्या सर्व 11 जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. 22 सप्टेंबर पासून महाराष्ट्रातील उर्वरित जिल्ह्यांमधून पावसाचा जोर कमी होणार आहे.