Havaman Andaj : महाराष्ट्रात सुरू असणाऱ्या मुसळधार पावसाला आता ब्रेक लागला आहे. राज्यातील बहुतांशी भागांमधून पावसाची तीव्रता कमी झाली आहे. पण, आज आणि उद्या महाराष्ट्रातील 18 जिल्ह्यात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. ज्येष्ठ हवामान अभ्यासक माणिकराव खुळे यांनी या संदर्भात एक नवीन अंदाज दिला आहे.
खुळे यांनी सांगितल्याप्रमाणे, मध्य महाराष्ट्रातील दहा जिल्ह्यांमध्ये म्हणजेच धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर तसेच मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांमध्ये म्हणजेच छत्रपती संभाजी नगर, धाराशिव, लातूर, बीड, जालना, नांदेड, परभणी, हिंगोली या दोन्ही विभागातील 18 जिल्ह्यांमध्ये 5 ऑक्टोबर पर्यंत ढगाळ हवामानाची शक्यता आहे.
या काळात या ठिकाणी फक्त ढगाळ हवामान राहील आणि अधून मधून हलका पाऊस पडणार असा अंदाज माणिकराव खुळे यांनी दिला आहे. या संबंधित भागात अगदीच तुरळक ठिकाणी किरकोळ पाऊस पडणार असा अंदाज आहे.
मात्र आज आणि उद्या मुंबई सह संपूर्ण कोकण आणि विदर्भातील सर्वच्या सर्व 11 जिल्ह्यांमध्ये म्हणजेच राज्यातील उर्वरित 18 जिल्ह्यांमध्ये आज आणि उद्या काही ठिकाणी पाऊस पडणार असा अंदाज आहे.
एक तारखेपासून मात्र या भागातही पाऊस उघडीप घेणार आहे. या 18 जिल्ह्यांमध्ये एक ते पाच ऑक्टोबर दरम्यान ढगाळ हवामान आणि अगदीच तुरळक ठिकाणी किरकोळ पाऊस पडण्याची शक्यता आहे.
5 ऑक्टोबर नंतर पुन्हा हवामानाचा मूड बदलणार
5 ऑक्टोबर नंतर मात्र राज्यात पुन्हा एकदा पाऊस सक्रिय होण्याची शक्यता आहे. 6 ऑक्टोबर पासून पुढील एक आठवडा म्हणजेच 13 ऑक्टोबर पर्यंत राज्यात जोरदार पावसाची शक्यता आहे.
महत्त्वाचे म्हणजे ऑक्टोबरच्या दुसऱ्या पंधरवड्यात केव्हाही मान्सून महाराष्ट्राचा निरोप घेऊ शकतो असेही खुळे यांनी आपल्या नवीन अंदाजात स्पष्ट केले आहे. एकंदरीत मान्सूनचा पाऊस आता महाराष्ट्राचा निरोप घेणार आहे.
पुढील महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यात मान्सून महाराष्ट्रातून काढता पाय घेणार असे चित्र दिसत आहे. तत्पूर्वी मात्र ऑक्टोबर मध्ये चांगला जोराचा पाऊस होणार आहे. तथापि मान्सूनची एक्झिट झाल्यानंतरही महाराष्ट्रात पाऊस सुरूच राहणार असा अंदाज आहे.
खुळे म्हणतात की, सध्या महाराष्ट्रात चक्रीवादळाचा सिझन सुरू आहे आणि या पार्श्वभूमीवर ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात सुद्धा राज्यात पावसाची शक्यता तयार होणार आहे. या अनुषंगाने शेतकरी बांधवांनी आपल्या शेतीच्या कामांचे नियोजन करणे त्यांच्यासाठी फायदेशीर ठरणार आहे.