Havaman Andaj : ऑगस्ट महिन्यात सुट्टीवर गेलेला मान्सून सप्टेंबर मध्ये पुन्हा एकदा सक्रिय झाला आहे. सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात राज्यातील तुरळक भागात पावसाने हजेरी लावल्यानंतर आता महाराष्ट्रात सर्व दूर पाऊस सक्रिय झाला आहे. राज्यात गुरुवारपासून अर्थातच सात सप्टेंबर पासून पावसाचा जोर वाढला आहे.
त्यामुळे सर्वत्र समाधानाचे वातावरण पाहायला मिळत आहे. काल अर्थातच 8 सप्टेंबरला राज्यातील बहुतांशी भागात जोरदार ते अति मुसळधार पाऊस पाहायला मिळाला. नाशिक जिल्ह्यातही बहुतांशी भागात अति मुसळधार पावसाची नोंद करण्यात आली आहे. गेल्या दोन दिवसांपासून राज्यातील विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि कोकणात जोरदार स्वरूपाचा पाऊस होत आहे.
यामुळे अडचणीत सापडलेली खरीप हंगामातील पिकांना नवसंजीवनी मिळणार असल्याचे मत व्यक्त होत आहे. तर शेतकरी बांधवांनी सध्या पडत असलेल्या पावसामुळे पिकांना फायदा होणार असला तरीदेखील या संपूर्ण वर्षाचे भवितव्य सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात कसा आणि किती पाऊस पडतो यावरच अवलंबून राहणार असल्याचे मत व्यक्त केले आहे.
अशातच भारतीय हवामान विभागाने पुढील काही दिवस महाराष्ट्रात असाच पाऊस पडत राहणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. तसेच हवामान विभागाने पुढील महिनाभर किती दिवस पाऊस पडणार आणि किती दिवस पावसाची उघडीप राहणार याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. म्हणजे भारतीय हवामान विभागाने पुढील महिनाभराचा हवामान अंदाज सार्वजनिक केला आहे.
आय एम डी मुंबई ने दिलेल्या माहितीनुसार, आज आणि उद्या कोकणात मुसळधार पावसाची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर कोकणासाठी ऑरेंज अलर्ट जारी झाला आहे. आज आणि उद्या मध्य महाराष्ट्रात देखील पावसाची शक्यता आहे. आज मध्य महाराष्ट्रासाठी येल्लो अलर्ट देण्यात आला आहे. आज मराठवाड्यात देखील पावसाची शक्यता आहे.
पण उद्यापासून पावसाचा जोर कमी होणार असं मुंबई आयएमडीने म्हटले आहे. विदर्भाबाबत बोलायचं झालं तर आज येथे पाऊस पडणार आहे. आज विदर्भासाठी येल्लो अलर्ट देण्यात आला आहे. पण उद्यापासून दोन दिवस विदर्भात पावसाची उघडीप राहणार अशी शक्यता आहे. मात्र त्यानंतर विदर्भात पुन्हा एकदा पाऊस सक्रिय होणार असा अंदाज यावेळी वर्तवण्यात आला आहे.
पुढील महिनाभर कस असेल हवामान
भारतीय हवामान विभागाने वर्तवलेल्या नवीन हवामान अंदाजानुसार, 9 सप्टेंबर ते 14 सप्टेंबर दरम्यान कोकण, उत्तर मध्य महाराष्ट्र, मराठवाड्याचा काही भाग आणि विदर्भाच्या काही भागात पाऊस पडणार असा अंदाज आहे. 15 सप्टेंबर ते 21 सप्टेंबर या काळात कोकण आणि विदर्भाच्या काही भागात पावसाची शक्यता आहे.
तसेच 22 सप्टेंबर ते 5 ऑक्टोबर या दोन आठवड्याच्या काळात सरासरी एवढा पाऊस पडणार असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. एकंदरीत 5 ऑक्टोबर पर्यंत राज्यात पाऊस पडत राहणार आहे. या पुढील एका महिन्याच्या काळात राज्यात भाग बदलत पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
यामुळे आता हवामान विभागाने वर्तवलेल्या या नवीन हवामान अंदाजानुसार राज्यात सप्टेंबर महिन्यात चांगला पाऊस पडतो का आणि ऑगस्ट महिन्यात निर्माण झालेली पावसाची तूट यामधून भरून निघते का हे विशेष पाहण्यासारखे राहणार आहे.