Havaman Andaj : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील हवामान प्रामुख्याने कोरडे राहिले आहे. आता पावसाने महाराष्ट्राकडे पाठ फिरवली आहे. मान्सून माघारी फिरल्यानंतर महाराष्ट्रात कुठेच पाऊस बरसलेला नाही. यावर्षी मान्सूनकाळात तर कमी पाऊस पडलाच पण परतीचा पाऊस देखील राज्यात मनसोक्त बरसला नाही.
यामुळे खरिपातील पिके संकटात आलीत आणि उत्पादनात देखील मोठी घट आली आहे. कमी पावसामुळे आगामी रब्बी हंगाम देखील प्रभावित होण्याची शक्यता आहे. यामुळे यावर्षी अवकाळी पाऊस का होईना पण पाऊस बरसला पाहिजे असे मत शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे. दुसरीकडे राज्यात आता थंडीची तीव्रता वाढत असल्याचे चित्र आहे.
जळगाव, पुणे, नाशिक यांसह संपूर्ण महाराष्ट्रात आता थंडीची तीव्रता वाढू लागली आहे. गुलाबी थंडीची आता चाहूल लागली आहे. सकाळी-सकाळी वातावरणात मोठा गारवा पाहायला मिळत आहे. पण दुपारचे तापमान सरासरी एवढेच पाहायला मिळत आहे. आगामी काही दिवसात दुपारचे तापमान देखील कमी होणार आहे. यामुळे थंडीची तीव्रता आणखी वाढणार आहे.
अशातच हवामान खात्याने आज आणि उद्या राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग तसेच मध्य महाराष्ट्रातील सातारा आणि कोल्हापूर या जिल्ह्यातील काही भागात हलका पाऊस पडेल असा अंदाज आहे. याशिवाय दक्षिण भारतात देखील पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, आज केरळ आणि तमिळनाडूमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
त्याचबरोबर केरळ, माहे, तामिळनाडू, पुद्दुचेरी, कराईकल, लक्षद्वीपमध्ये पुढील चार दिवस हलका ते मध्यम पाऊस पडेल आणि दक्षिण कर्नाटकात 30 आणि 31 ऑक्टोबर रोजी हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. उर्वरित भारतात मात्र पुढील पाच दिवस हवामानात फारसा बदल होणार नाही असे देखील हवामान खात्याच्या माध्यमातून स्पष्ट करण्यात आले आहे.