Havaman Andaj : नवीन वर्ष सुरू होण्यास अवघ्या नऊ ते दहा दिवसांचा काळ बाकी आहे. म्हणजेच डिसेंबर महिना जवळपास समाप्तीकडे अग्रेसर आहे. मात्र आता कुठे महाराष्ट्रात थंडीची तीव्रता वाढू लागली आहे. दरवर्षी नोव्हेंबरच्या दुसऱ्या पंधरवड्यापासून थंडीचा जोर वाढत असतो.
काही भागात तर नोव्हेंबरच्या अगदी सुरुवातीलाच कडाक्याची थंडी पडते. यंदा मात्र थंडीला खूपच उशीर झाला आहे. राज्यात गेल्या पाच ते सहा दिवसांपासून थंडीची तीव्रता वाढलेली आहे.
मात्र त्याआधी राज्यातील बहुतांशी भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली होती. नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात आणि डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात राज्यातील विविध भागांमध्ये अवकाळी पाऊस बरसला.
काही ठिकाणी गारपीट देखील झाली. यामुळे राज्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. पण आता महाराष्ट्रातील हवामान कोरडे झाले असून थंडीचा जोर वाढत आहे. तर दुसरीकडे देशातील काही भागांमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे.
गेल्या पाच ते सहा दिवसांपासून देशाच्या दक्षिणेकडील तामिळनाडू राज्यात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस बरसत आहे. यामुळे तेथील सामान्य जनजीवन विस्कळीत झाले आहे. अशातच आता भारतीय हवामान खात्याने आणखी एक नवीन हवामान अंदाज दिला आहे.
हवामान खात्याने वर्तवलेल्या नवीन हवामान अंदाजानुसार, आगामी 24 तासात दिल्ली आणि एनसीआर मध्ये पाऊस हजेरी लावणार आहे. तसेच दक्षिण भारतातील अनेक राज्यांमध्ये पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तामिळनाडूमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून पाऊस पडत आहे.
विशेष बाब म्हणजे आगामी काही दिवस तामिळनाडूमध्ये पावसाचे थैमान सुरूच राहणार आहे. देशातील केरळ, माहे आणि लक्षद्वीपमध्येही हलक्या पावसाचा अंदाज देण्यात आला आहे. याशिवाय आज राजस्थानमध्ये देखील पाऊस हजेरी लावणारा असा अंदाज आहे.
दुसरीकडे उत्तराखंड, हिमाचल आणि जम्मू-काश्मीरमधील उंच भागात जोरदार बर्फवृष्टी होत आहे. हिमवृष्टीसोबतच उत्तराखंड आणि हिमाचलच्या अनेक भागात हलका पाऊसही पडत आहे.
याचा परिणाम म्हणून महाराष्ट्रासह देशातील अनेक मैदानी भागात थंडीची लाट सुरू आहे. तापमानात सातत्याने घट नोंदवली जात आहे.
एकंदरीत महाराष्ट्रात आता थंडीची लाट आली असून आगामी काही दिवस राज्यातील हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. राज्यात आता अवकाळी पाऊस पडणार नाही असे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.