Havaman Andaj : महाराष्ट्रात गेल्या दीड महिन्यांपासून गायब झालेल्या पावसाने पुन्हा एकदा हजेरी लावली आहे. जवळपास दीड महिने पावसाने महाराष्ट्राकडे पाठ फिरवली होती. काही भागात तर ऑगस्ट महिन्यापासून पाऊस गायब होता. म्हणजेच काही भागात जवळपास पावणे दोन महिन्यांपेक्षा अधिकचा कालावधी उलटला असूनही पाऊस झालेला नव्हता.
पण गेल्या दोन दिवसांपासून राज्यातील विविध भागात मुसळधार ते अति मुसळधार स्वरूपाचा पाऊस होत आहे. गेल्या 24 तासापासून राज्यातील विविध भागात पावसाचा जोर वाढला असल्याचे सांगितले जात आहे. सिक्किम ते मध्य महाराष्ट्र या भागात कमी दाबाचा पट्टा तयार झाला असल्याने सध्या महाराष्ट्रात पावसासाठी पोषक हवामान तयार होत असून राज्यात याच हवामान प्रणालीमुळे सध्या मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होत असल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे.
निश्चितच सध्या पडत असलेल्या पावसामुळे दुष्काळाच्या उंबरठ्यावर उभा असलेल्या महाराष्ट्राला मोठा दिलासा मिळणार आहे यात शँकाच नाही. विशेष बाब अशी की भारतीय हवामान खात्याने 27 सप्टेंबर पर्यंत राज्यात जोरदार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. 27 सप्टेंबर पर्यंत म्हणजेच बुधवार पर्यंत राज्यातील विविध भागात जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून या पार्श्वभूमीवर राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यांसाठी हवामान खात्याच्या माध्यमातून येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
दरम्यान २७ सप्टेंबर पर्यंत पडणाऱ्या या पावसाचा जोर विदर्भात सर्वाधिक राहणार असल्याचे सांगितले जात आहे. हवामान खात्याने बुधवारपर्यंत संपूर्ण महाराष्ट्राला पिवळा इशारा दिला आहे. मात्र या कालावधीत विदर्भात पावसाचा जोर जास्त राहील तर उर्वरित महाराष्ट्रात पावसाचा जोर कमी राहणार आहे.
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार 24 सप्टेंबर ते 27 सप्टेंबर दरम्यान राज्यातील विदर्भ विभागातील यवतमाळ, वाशिम, वर्धा, नागपूर, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा, अमरावती, अकोला तसेच मराठवाडा विभागातील छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड या जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर विदर्भ आणि मराठवाड्यातील या जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे.
सोबतच मध्य महाराष्ट्र विभागातील पुणे, सातारा या जिल्ह्याला 26 सप्टेंबरसाठी आणि सोलापूर जिल्ह्याला 27 सप्टेंबरसाठी येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच उत्तर महाराष्ट्र विभागातील नाशिक, जळगाव या जिल्ह्यांना 27 सप्टेंबर पर्यंत पावसाचा इशारा देण्यात आला आहे. कोकणातील रत्नागिरी, रायगड आणि ठाणे या जिल्ह्यासाठीही 27 सप्टेंबर पर्यंत हवामान खात्याने पावसाचा पिवळा इशारा जारी केला आहे.