Havaman Andaj : भारतीय हवामान खात्याने मान्सूनच्या परतीच्या प्रवासाबाबत मोठी माहिती दिली आहे. आतापर्यंत मान्सूनने कोण कोणत्या राज्यांमधून काढता पाय घेतला आहे? आगामी काळात कोणकोणत्या राज्यांमधून मान्सून माघार घेणार तसेच कोणत्या राज्यात मुसळधार पाऊस बरसणार या संदर्भात आयएमडी कडून मोठी माहिती देण्यात आली आहे.
खरेतर मान्सूनच्या प्रस्थानानंतर दिल्ली एनसीआरच्या तापमानात सातत्याने वाढ होत आहे. उष्णतेमुळे लोकांचे हाल झाले आहेत. हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, 4 ऑक्टोबर रोजी दिल्लीचे हवामान आणखी क्लिअर होणार आहे आणि म्हणूनचं तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे.
अशातच भारतीय हवामान खात्याने सध्या उत्तर बंगालच्या उपसागरात आणि आसपास कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले असल्याची माहिती दिलीय. त्यामुळे येथे पाऊस पडत असून देशातील काही राज्यांमध्ये अतिवृष्टी होणार असा अंदाज देण्यात आला आहे.
हवामान खात्यानुसार, पश्चिम उत्तर प्रदेशात हवामान कोरडे राहील. पण, गोरखपूर, महाराजगंज, कुशीनगर, देवरिया आदींसह राज्याच्या उत्तर-पूर्व भागात रिमझिम पाऊस पडू शकतो. तसेच, बिहार मधुबनी, अररिया, सुपौल, मधेपुरा, सहरसा, कटिहार, कैमूर, रोहतास आणि बक्सरमध्ये पावसाची शक्यता आहे.
झारखंडमध्येही पाऊस आणि वादळी वाऱ्याबाबत यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. येथे 4 आणि 5 ऑक्टोबर रोजी पाऊस पडू शकतो. नॉर्थ ईस्ट रीजनमध्येही पावसाचा अंदाज आहे. त्याचबरोबर आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुरामध्ये 6 ते 8 ऑक्टोबर दरम्यान अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.
एवढेच नाही तर भारतीय हवामान खात्याने मान्सून महाराष्ट्रातून कधीपर्यंत माघार घेणार या संदर्भात सुद्धा अपडेट दिली आहे. नैऋत्य मान्सूनने जम्मू-काश्मीर, लडाख, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, हरियाणा, दिल्ली, चंदीगड आणि पश्चिम राजस्थानच्या उर्वरित भागांना निरोप दिला आहे.
लवकरच पश्चिम उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान, गुजरात आणि महाराष्ट्राच्या उर्वरित भागातूनही मान्सून माघार घेणार असे आयएमडीने आपल्या नवीन बुलेटिन मध्ये स्पष्ट केले आहे. दरम्यान आज महाराष्ट्रातील मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा विभागातील काही जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे.
तसेच कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागांमध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार असा अंदाज आहे. म्हणजेच राज्यात अजून परतीचा पाऊस सक्रिय आहे. परंतु येत्या काही दिवसात परतीचा पाऊस थांबेल आणि मान्सून एक्झिट घेणार असे चित्र तयार होत आहे. संपूर्ण महाराष्ट्रातून 12 ते 15 ऑक्टोबर दरम्यान मान्सून माघारी फिरणार असे हवामान अभ्यासकांचे मत आहे.