Havaman Andaj : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील हवामानात सातत्याने बदल होत आहेत. कडाक्याची थंडी आता कमी झाली असून राज्यातील बहुतांशी भागांमधील किमान तापमान वाढले आहे. कमाल तापमानात देखील थोडीशी वाढ झाली आहे. दुसरीकडे राज्यात पावसासाठी पोषक परिस्थिती तयार होत आहे.
भारतीय हवामान खात्याने आज आणि उद्या राज्यातील बहुतांशी जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता वर्तवली आहे. हवामान खात्याने सांगितल्याप्रमाणे आज आणि उद्या राज्यातील बारा जिल्ह्यांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे. या अनुषंगाने संबंधित जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आपल्या शेती पिकांची काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.
आपणास ठाऊकच असेल की नुकत्याच काही दिवसांपूर्वी बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाला होता आणि यामुळे फेंगल चक्रीवादळाची निर्मिती झाली. या चक्रीवादळामुळे देशातील दक्षिणेकडील राज्यांमध्ये मुसळधार ते अति मुसळधार पाऊस झाला. काही ठिकाणी वादळ ही निर्माण झाले.
तेव्हा वादळी पावसामुळे सर्वसामान्य जनजीवन मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाले होते. दक्षिणेकडील तामिळनाडू पुदुच्चेरी कर्नाटक यांसारख्या अनेक राज्यांमध्ये त्यावेळी पाऊस झाला होता.
दरम्यान याचा परिणाम आपल्या महाराष्ट्रावरही झाला आणि राज्यात हलक्या पावसाची नोंद करण्यात आली होती. आता पुन्हा एकदा महाराष्ट्रात पावसासाठी पोषक परिस्थिती तयार झाली असून भारतीय हवामान खात्याकडून राज्यातील काही जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार आज २७ आणि उद्या २८ डिसेंबर रोजी महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे.
हवामान विभागाने आज आणि उद्या राज्यातील उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता वर्तवली आहे. राज्यातील धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, पुणे, जालना, परभणी, बीड, अकोला, अमरावती, बुलडाणा आणि वाशीम या जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे.
या पार्श्वभूमीवर वर सांगितलेल्या सर्व जिल्ह्यांना यलो अलर्ट सुद्धा जारी करण्यात आला आहे. यामुळे या भागातील शेतकऱ्यांच्या रब्बी हंगामातील गहू हरभरा ज्वारी यांसारख्या अनेक पिकांना फटका बसण्याची शक्यता आहे.
कांदा आणि फळबागांना देखील या अवकाळी पावसाचा फटका बसू शकतो अशी भीती व्यक्त होत आहे. विशेष बाब अशी की यातील काही जिल्ह्यांमध्ये गारपीट देखील होऊ शकते असा एक अंदाज आयएमडीच्या तज्ञांनी दिलेला असून यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढलेली आहे.