Havaman Andaj : गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्रासहित देशातील हवामानात सातत्याने बदल पाहायला मिळत आहे. नुकत्याच काही दिवसांपूर्वी राज्यात अवकाळी पावसाचे त्राहीमाम पाहायला मिळाले. 10 फेब्रुवारीपासून ते 13 फेब्रुवारी पर्यंत राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाचे सावट पाहायला मिळाले.
या कालावधीत विदर्भ विभागातील काही जिल्ह्यांमध्ये गारपिट देखील झाली आहे. परिणामी अगदी तळहाताच्या फोडाप्रमाणे जोपासलेले रब्बी हंगामातील गहू आणि हरभऱ्याचे पीक पूर्णपणे वाया गेले आहे.
यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. मात्र, 13 फेब्रुवारी नंतर हवामान पुन्हा एकदा पूर्व पदावर आले. राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये तापमान वाढ पाहायला मिळाली.
काल राज्यातील मराठवाडा विदर्भ मध्य महाराष्ट्र आणि कोकणात हवामान प्रामुख्याने कोरडे पाहायला मिळाले. अशातच मात्र हवामान खात्याने पुन्हा एकदा महाराष्ट्रात अवकाळी पावसाची शक्यता वर्तवली आहे.
पुणे वेधशाळेने दिलेल्या माहितीनुसार पुढील दोन दिवस राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाची शक्यता तयार होत आहे.
खरे तर अवकाळी पावसानंतर आणि गारपिटीनंतर राज्यातील अनेक जिल्ह्यातील तापमान 30° पर्यंत पोहोचले होते. यामुळे महाराष्ट्रात उकाडा वाढला होता.
परंतु आता अचानक राज्यातील हवामानात बदल झाला असून काही ठिकाणी ढगाळ हवामान तयार झाले असून यामुळे अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
या जिल्ह्यात अवकाळी पावसाची शक्यता
पुणे वेधशाळेने दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील विदर्भ आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाची शक्यता तयार होत आहे. येथे आगामी दोन दिवस हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस बरसणार असा अंदाज आहे.
भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि नागपूर या जिल्ह्यांमध्ये हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून या पार्श्वभूमीवर संबंधित जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे.
दक्षिण गुजरात, मराठवाडा आणि विदर्भात चक्रीय वाऱ्याची स्थिती तयार होत असून या पार्श्वभूमीवर येथे अवकाळी पाऊस हजेरी लावणार असा अंदाज आहे. दुसरीकडे कोकण आणि मध्य महाराष्ट्रात हवामान प्रामुख्याने कोरडे राहणार आहे.