Havaman Andaj : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील उत्तरेकडील जिल्ह्यांमध्ये सकाळी-सकाळी थंडीची तीव्रता वाढत असल्याचे पाहायला मिळत आहे. एकीकडे उत्तर महाराष्ट्रात गारठा वाढत आहे तर दुसरीकडे महाराष्ट्रातील विदर्भ आणि मराठवाड्यातील बहुतांशी जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार अवकाळी पाऊस आणि गारपीटीची हजेरी पाहायला मिळत आहे.
विशेष बाब अशी की उत्तर महाराष्ट्रातील खानदेश विभागातील जळगाव जिल्ह्याच्या चाळीसगाव तालुक्यात देखील काही ठिकाणी गारपीट झाल्याची नोंद करण्यात आली आहे.
चाळीसगाव तालुक्यातील पाटणा, गणेशपूर, बेलदारवाडी, बाणगाव, शिंदी आणि ओढरे गावात गारपीट झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.
याशिवाय चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा, भद्रावती, चंद्रपूर आणि चिमूर या तालुक्यांमध्ये देखील गारपीट झाल्याची नोंद करण्यात आली आहे.
गारपीटीने राज्यातील शेतकऱ्यांचे पुन्हा एकदा मोठे नुकसान केले आहे. अशातच, हवामान खात्याने आज पुन्हा एकदा महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये वादळी पावसाची शक्यता वर्तवली आहे.
काय म्हणतय भारतीय हवामान विभाग
हवामान विभागाने दिलेल्या बहुमूल्य माहितीनुसार, विदर्भपासून केरळपर्यंत असलेला हवेचा कमी दाबाचा पट्टा नुकताच निवळला आहे.
पण, मालदीवपासून उत्तर कर्नाटकपर्यंत, तसेच पूर्वमध्य अरबी समुद्रापासून मध्य प्रदेशपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा तयार झाला असल्याचे हवामान खात्याने स्पष्ट केले आहे. याचा परिणाम म्हणून सध्या महाराष्ट्रात अवकाळी पाऊस आणि गारपीट सुरू आहे.
या हवामान प्रणालीमुळे मध्य भारतासह महाराष्ट्रात ढगाळ हवामान तयार होत असून अवकाळी पावसाची हजेरी लागत आहे. विशेष म्हणजे आज देखील राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
आय एम डी ने सांगितल्याप्रमाणे आज विदर्भातील वाशीम, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर जिल्ह्यात वादळी पावसाची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर या संबंधित जिल्ह्यांना आज येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
तसेच मराठवाड्यात आज तुरळक ठिकाणी विजांसह पावसाचा अंदाज देण्यात आला आहे. तापमानातही चढ-उतार होण्याची शक्यता हवामान विभागाने दिली आहे. त्यामुळे मराठवाडा आणि विदर्भातील शेतकऱ्यांना आपल्या शेती पिकांची काळजी घ्यावी लागणार आहे.