Havaman Andaj : महाराष्ट्रासहित देशातील हवामानात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने बदल पाहायला मिळत आहे. देशातील काही राज्यांमध्ये थंडीची तीव्रता वाढत आहे तर काही ठिकाणी पाऊस बरसत आहे. एकंदरीत भारतात सध्या विरोधाभासी वातावरण पाहायला मिळत आहे.
विरोधाभासी वातावरणामुळे काही ठिकाणच्या शेती पिकांसाठी पोषक वातावरण तयार होत आहे तर काही ठिकाणचे शेती पिक पावसामुळे वाया गेले आहे.
खरे तर सध्या भारताच्या डोंगराळ भागात बर्फ वृष्टी होत आहे. बर्फवृष्टीमुळे देशाच्या उत्तरेकडील राज्यांमध्ये थंडीचा जोर वाढत आहे.
याचा परिणाम म्हणून आपल्या महाराष्ट्रात देखील थंडीची तीव्रता पाहायला मिळत आहे. येत्या दोन ते तीन दिवसात राज्यातील तापमानात आणखी घट होईल आणि थंडीची तीव्रता वाढेल असे हवामान खात्याने स्पष्ट केले आहे.
विशेष म्हणजे भारतीय हवामान खात्याने देशातील तब्बल 13 राज्यांमध्ये पावसाची शक्यता वर्तवली आहे. अनेक भागात ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने पावसाची शक्यता तयार होत असल्याची माहिती हवामान खात्याने दिली आहे.
वेस्टर्न डिस्टर्बन्सच्या प्रभावामुळे येत्या ४८ तासांत जम्मू-काश्मीर, लडाख, हिमाचल प्रदेशमध्ये मुसळधार पाऊस बरसणार असा अंदाज देण्यात आला आहे. तसेच या राज्यातील काही भागात बर्फवृष्टी होईल अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे.
हवामान खात्याने दिलेल्या बहुमूल्य माहितीनुसार, ३१ जानेवारी ते २ फेब्रुवारी या कालावधीत जम्मू-काश्मीर, उत्तराखंड, पंजाब, हरियाणा, पश्चिम उत्तर प्रदेश, चंदीगड आणि बिहारमध्ये जोरदार पाऊस हजेरी लावणार असा अंदाज आहे.
यामुळे संबंधित भागातील शेतकऱ्यांना आपल्या शेती पिकांची विशेष काळजी घ्यावी लागणार आहे. तसेच, अंदमान आणि निकोबार गिलगिट-बाल्टिस्तान, मुझफ्फराबाद, लडाख आणि हिमाचल प्रदेशात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या प्रदेशात वादळी वाऱ्यासह हलकां पाऊस हजेरी लावणार असे आयएमडीने स्पष्ट केले आहे.
आय एम डी ने दिलेल्या माहितीनुसार आगामी काही दिवस राज्यातील अहमदनगर, पुणे, छत्रपती संभाजीनगर, बुलढाणा, अकोला, अमरावती, नागपूर, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात पहाटेचे किमान तापमान हे ८ ते १० डिग्री सेल्सिअसच्या दरम्यान कायम राहणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रात आगामी काही दिवस थंडीची तीव्रता अशीच पाहायला मिळणार आहे.