Havaman Andaj : गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्रासहित देशातील अनेक राज्यांमध्ये हवामानात सातत्याने बदल होत आहे. हवामान बदलामुळे राज्यासह देशातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यात महाराष्ट्रात अवकाळी पाऊस झाला होता.
त्यावेळी काही ठिकाणी गारपीट झाल्याची नोंदही करण्यात आली. याशिवाय या नवीन वर्षाची सुरुवात देखील अवकाळी पावसाने झाली. जानेवारी, फेब्रुवारी तसेच मार्च महिन्याची सुरुवातही अवकाळी पावसाने झाल्याने राज्यातील शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे मोठे नुकसान झाले.
गेल्या आठवड्याभरापासून राज्यातील हवामान मात्र आता कोरडे पाहायला मिळत आहे. राज्यात सकाळी थोडासा गारवा जाणवतोय आणि दुपारी उन्हाच्या झळा सहन कराव्या लागत आहेत. अशातच मात्र राज्यातील हवामानात पुन्हा एकदा बदल होण्याची शक्यता आहे.
खरेतर हवामान खात्याने देशातील उत्तरेकडील राज्यांमध्ये अवकाळी पावसाचा, हिमवृष्टीचा आणि गारपिटीचा अंदाज दिला आहे. आपल्या महाराष्ट्रात मात्र आगामी काही दिवस हवामान कोरडे राहणार आहे.
राज्यातील अनेक भागात सध्या दिवसाचे कमाल तापमान 37 अंश सेल्सिअसच्या पुढे नमूद केले जात आहे. नुकत्याच काही दिवसांपूर्वी उत्तर महाराष्ट्रातील मालेगाव मध्ये कमाल तापमान 38 अंश सेल्सिअस नमूद करण्यात आले होते.
अर्थातच वाढत्या उकाड्यामुळे नागरिक मोठ्या प्रमाणात घामाघुम होत आहेत. मात्र असे असले तरी आपल्या महाराष्ट्रात पुन्हा एकदा अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
आगामी चार दिवस राज्यातील हवामान कोरडे राहील मात्र 16 आणि 17 मार्च 2024 रोजी राज्यातील काही भागांमध्ये अवकाळी पावसाचा अंदाज देण्यात आला आहे. राज्यातील विदर्भात 16 आणि 17 मार्च अवकाळी पावसाची हजेरी लागणार असा अंदाज हवामान खात्याने दिला आहे.
यामुळे विदर्भ विभागातील शेतकऱ्यांची पुन्हा एकदा चिंता वाढणार आहे. हवामान खात्याने मात्र राज्यातील मराठवाडा, कोकण पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रात अवकाळी पावसाची शक्यता नसल्याचे स्पष्ट केले आहे.
एकंदरीत, येत्या तीन ते चार दिवसात राज्यातील हवामानात मोठा बदल होईल आणि विदर्भ विभागात अवकाळी पावसासाठी पोषक परिस्थिती तयार होईल असे आयएमडीने यावेळी आपल्या नवीन बुलेटिन मध्ये स्पष्ट केले आहे.
खरंतर, नुकत्याच काही दिवसांपूर्वी राज्यातील मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाने आणि गारपिटीने तडाखा दिला आहे. अशातच आता पुन्हा एकदा विदर्भात पावसासाठी पोषक परिस्थिती तयार होत आहे. यामुळे विदर्भ विभागातील शेतकऱ्यांची साहजिकच चिंता वाढणार आहे.